▪️अयोध्येत जन्मभूमीवर राम मंदिर उभे राहिले आहे व भव्य-दिव्य झाले आहे. हजार वर्षे टिकेल एवढे मजबूत ही झाले आहे. पण ते हजार वर्षे टिकेल म्हणजे काय? तर त्या मंदिरामधून जे संदेश हिंदू समाजाला मिळत आहेत ते हिंदू समाजाने समजावून घेणे व संपूर्ण समाज म्हणून त्यावर अमल करत रहाणे म्हणजे अयोध्यास्थित राम मंदिराचे टिकणे आहे.
▪️आज आणखी एक संदेश टिपून घेऊयात. राममंदिरात रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हिंदू समाज, त्यातील संत-महंत जेवढ्या उत्साहाने साजरा करीत आहेत, त्यासाठी लगबग, धावपळ करीत आहेत, तेवढीच किंवा काकणभर अधिकच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे, त्यांचे सरकार करत आहे, राजकीय पक्ष व कार्यकर्ते करीत आहेत व याला विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त भाजपचे कार्यकर्ते नव्हे तर विरोधकही आमंत्रणाची आस धरून आहेत किंवा काही अति कडवे कानशीलावर बोटे मोडत बसले आहेत.
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक भावना काहीही असतील आणि म्हणून ते भक्तीभावाने रामलल्लांच्या गृहप्रवेशासाठी असुसलेले असतील पण ते उघडपणे देशाला २२ जानेवारीचा सोहळा उत्स्फूर्तपणे व भक्तीभावाने साजरा करा असे सांगत आहेत. येथूनच राम मंदिराकडून येणाऱ्या संदेशांची सुरवात होते.
▪️१९४७ साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून व त्याही आधी पन्नास वर्षे संपूर्ण देशाला व त्यातही हिंदू समाजाला; शासन व हिंदू रितीरिवाज, कर्मकांडे, संस्कार, संस्कृती हे परस्परविरोधी आहेत आणि म्हणून सर्व राजकीय व शासकीय व्यासपीठे ही फक्त हिंदू हिताला वर्ज्य आहेत, अशी आफूची गोळी देण्याचे काम अव्याहतपणे चालू होते. मुस्लिम, ख्रिश्चन हे अल्पसंख्याक म्हणून संविधानापासून सर्वत्र त्यांना स्वतःची ओळख जपण्याचे स्वैर स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे भारतात हिंदू असणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे असे स्वरूप होते.
▪️अशावेळी सुमारे तेवढाच १०० वर्षांचा काळ हिंदू समाजही संघटीत होत, हे क्लैब्य नाकारून विजयी हुंकार देण्यासाठी प्रयत्न करत होता. रामलल्लाने हिंदू तेजाला हाक घातली, “समाजपुरूषा होई जागृत.” त्यामुळे हिंदू समाजाने एकाचवेळी सरकारी शहामृगी पवित्रा व अल्पसंख्याकांच्या अरेरावीला आव्हान दिले व हे राष्ट्र माझ्या सांस्कृतिक संवेदनांच्या आधारे चालणार असल्याचे ठणकावून सांगितले आणि म्हणून २०१४ साली झालेले परिवर्तन अस्तित्वात आले.
▪️राजकीय नेतृत्व, पक्ष, कार्यकर्ते यांना हिंदू समाजाने राष्ट्र संकल्पना समजावून दिली. ख्रिश्चनबहुल देशात बायबल पांथिक म्हणून सरकार विरोधी नसते, इस्लामिक देशात तर बघायलाच नको. याचप्रमाणे भारतात हिंदू संस्कार हे सरकारात, शासकीय व्यवहारात बघायला मिळण्यात काहीच चूक नाही, नव्हे ते बघायला मिळणेच योग्य आहे, हे हिंदू समाजाने अयोध्येतील राम मंदीर निर्माण आंदोलन व मंदिराच्या प्रत्यक्ष निर्मितीमधून सिद्ध केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय उत्साहाने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होत आहेत ही परिस्थिती हिंदू समाजाने स्व-कर्तृत्वाने निर्माण केली आहे. म्हणूनच, ती टिकवून ठेवण्यासाठी हिंदू समाजाने “होय, मी जागृत आहे, संघटित आहे” आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शद्बात सांगायचे झाले तर “प्रतिक्रियाक्षम देखील आहे” हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे, हा संदेश राममंदिर भविष्यासाठी हिंदू समाजाला देत आहे.
▪️देशातील सरकार व शासकीय व्यवस्था भारताच्या सांस्कृतिक उत्थानासाठी क्रियाशीलच राहतील व परत माघार घेऊन कोषात जाणार नाहीत हे डोळ्यात तेल घालून पाहण्याचे काम हिंदू समाजाचे आहे हा भविष्यासाठीचा संदेश हे राममंदिर देत आहे.
▪️अन्यथा राजकीय तसेच राष्ट्रीय, सांस्कृतिक आशा-आकांक्षा एक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले अथक परिश्रम अळवावरचे पाणी ठरेल.
एक नेता हा कधीही चिरस्थायी परिवर्तन आणू शकत नाही, ते काम संघटित झालेल्या संपूर्ण समाजालाच जागृतपणे करावे लागते हा राम मंदिराचा संदेश आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे,
– सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे