बाजारातील खाण्याच्या डाळींनी गेल्या काही वर्षांपासून गगनाला पोहचणारे दर गाठले होते. तूरडाळ १८० रु. तर मुगडाळ व इतर डाळींनी ही शंभरी पार केली होती. परंतु आता सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. तूरडाळ व इतर डाळींच्या किमतीमध्ये गेल्या वर्षभरापासून घसरण होत आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे किंमत २० रुपायांनीं घसरली आहे.
घाऊक बाजारात १६५ ते १७० तर इतर किरकोळ बाजारात १८० रुपये प्रतिकिलोपर्यंत तूरडाळीचे दर गेले होते. साधारणपणे मागील वर्षी तूरडाळीच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्क्याने वाढ झाली होती. डिसेंबरच्या सुरवातीला तूरडाळीचे दर तेजीत होते. मात्र नवीन वर्षांपासून बाजारात नवीन माळ येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत तूरडाळीच्या किमतीमध्ये २० रुपयांनी घसरण झाली आहे. सोबतच मुगडाळचे दर १० रुपायांनीं घसरले. तर चणाडाळ, मसूरडाळीचे दर स्थिर आहेत.
एकीकडे इतर डाळी स्वस्त होत असतानाच किरकोळ बाजारात उडीदडाळ काही प्रमाणात महागली आहे. किरकोळ बाजारात उडीदडाळ दहा रुपयांनी वाढली असून, १३० रुपये प्रतिकिलोप्रमाणे उडीदडाळची विक्री सुरु आहे.
तूरडाळीचे गेल्या वर्षभरात चढ उतार पाहायला मिळाले. उत्पादन कमी असल्यामुळे सुरवातीला तूरडाळीचे दर वाढले त्यानंतर जुलैमध्ये तूरडाळ १४० रुपये किलोवर येऊन पोहचली. दिवाळी दरम्यान प्रतिकिलो १६० रुपये दर होते तर नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किरकोळ बाजारात डाळीचे दर १६० वर पोहचले. डिसेंबरमध्ये डाळीचे आवक वाढले आणि त्यांनतर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्या दरम्यान तूरडाळीच्या किमतीमध्ये घसरण होण्यास सुरवात झाली.