Ira Khan Wedding | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) घरी सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. आज आमिर खानची लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) तिचा प्रियकर नूपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात (Wedding) अडकणार आहे. वांद्रे येथील ताज लँड एंड हॉटेलमध्ये त्या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.
काल आयरा आणि नूपुरचा हळदीचा कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात पार पडला. तर आयराच्या मेहंदी कार्यक्रमाचं आयोजन बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरी करण्यात आलं होतं. तसंच आज महाराष्ट्रीयन पद्धतीनं आयरा-नूपुरचा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या विवाहसोहळ्याला त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे आयरा-नूपुरच्या लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी एक खास नियम बनवण्यात आला आहे. या लग्नसमारंभात पाहुण्यांसाठी नो गिफ्ट पॉलिसी काढण्यात आली आहे. म्हणजेच लग्नात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना आहेर न आणण्याची अट घालण्यात आली असून त्याजागी त्यांना एक पर्याय देण्यात आला आहे.
आयरा आणि नूपुरनं त्यांच्या लग्नात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांकडून भेटवस्तू स्वीकारण्याऐवजी त्यांच्या संस्थेला देणगी देण्याची विनंती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तूंऐवजी ‘आगस्तू फाउंडेशन’ला देणगी द्यावी, अशी विनंती आयरा आणि नूपुरने केली आहे. सध्या आयरा आणि नूपुरच्या या निर्णयाचं सगळीकडे कौतुक होत आहे.