पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लक्षद्वीपमध्ये १,१५६ कोटीं रुपयांच्या अनेक विकासकामांचे उदघाटन केले. कावरत्तीमध्ये पंतप्रधान मोदींनी या विकासकामांचे उदघाटन केले. २०२० मध्ये मोदींनी येत्या १००० दिवसांमध्ये तुम्हाला फास्ट इंटरनेटची सुविधा मिळेल अशी खात्री येथील नागरिकांना दिली होती. या कार्यक्रमादरम्यान, कोची-लक्षद्वीप सबमरीन ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टचे उदघाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे येथील नागरिकांना आता फास्ट इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. तसेच भारत जागतिक मत्स्य खाद्य बाजारामध्ये आपला हिस्सा वाढवण्यावर भर देत असून, याचा फायदा लक्षद्वीपला होत असल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांच्या उद्घाटनादरम्यान लक्षद्वीपमधील इंटरनेट कनेक्टीव्हिटीबाबत बोलताना म्हणाले, ”मी तुम्हाला २०२० मध्ये खात्री दिली होती की, येत्या एक हजार दिवसांमध्ये तुम्हाला फास्ट इंटेरनेटची सुविधा मिळेल. आज कोची-लक्षद्वीप सबमरीन ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टचे उद्घाटन केले आहे. ज्यामुळे तुम्हाला जास्त वेगाने इंटेरनेटचा लाभ घेत येणार आहे.” पुढे बोलताना मोदी म्हणाले, ”लक्षद्वीपच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (BESS) वर आधारित असलेला सौर ऊर्जा प्रकल्प हे त्याचेच एक उदाहरण आहे. लक्षद्वीपचा पहिला बॅटरीवर आधारित असणारा सौर प्रकल्प हाये. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.”