भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, जोतीरावांच्या पत्नी, त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या समाजसेविका असलेल्या सावित्रीबाई आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांनी स्वतःचा संसार, मुलेबाळे, घरदार या ऐहिक सुखाला ठोकरून आपल्या आदर्श पतीबरोबर जगाचा संसार केला. त्या केवळ जोतीरावांच्या अर्धांगी होत्या, त्यापेक्षाही त्या त्यांच्या क्रांतीकार्याच्याही अर्धांगिनी होत्या.
जोतिराव आणि सावित्रीबाई यांची स्त्रिया, शुद्र-अतिशूद्र, अनाथ, विधवा, शेतमजूर-शेतकरी या वर्गांबाबत त्यांना प्रेम, आत्मीयता याबरोबरच कळवळा, पोटतिडीक होती ती समानशीले अशीच होती. म्हणूनच विद्येशिवाय कसल्याही प्रकारची प्रगती शक्य नाही, हे अचूक ओळखूनच महात्मा फुले यांनी तत्कालीन शूद्र-अतिशूद्र व स्त्री यांच्या शिक्षणाने आपल्या अलौकिक क्रांतिकारी कार्याचा आरंभ केला. पुणे हे त्यांच्या क्रांतीकार्याचे केंद्र होते. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य क्रम दिला पाहिजे हे पहिल्यांदा सांगणारा पहिला भारतीय द्रष्टा म्हणजे म.फुले. त्यांना तशीच साथ देणाऱ्या सावित्रीबाईंच्या ठायी असलेली कर्तबगारी त्यांना ठाऊक होतीच. स्त्रीशिक्षणाच्या कार्याची मुहूर्तमेढ या पतिपत्नींच्या दिव्य कार्याने झाली.
महात्मा फुले यांचे कार्य अधिक प्रभावीपणे आणि त्यांच्या इतक्याच तळमळीने आणि कसोशीने करणाऱ्या सावित्रीबाई प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. त्यांच्या कृतिशील शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांच्या कवितांची दखल घेणे आवश्यकच आहे. कारण आज महाराष्ट्रात मोठया संख्येने सर्वच समाजघटकांत आपल्या प्रतिभेने विद्यार्थिनी, शिक्षिका, प्राध्यापिका, गृहिणी यांच्यापासून ते वकील डॉक्टर, वकील आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील महिला समर्थपणे लिहू लागल्या आहेत. सावित्रीबाईंचा वसा-वारसा चालवत आहेत. त्यांनाही आपापल्या क्षेत्रात काही समाजोपयोगी काम करायचे आहे. अशा महिलांबरोबरच सामाजिक कार्य करणाऱ्या सर्वांनीच सावित्रीबाईंची कविता वाचली अनुभवली पाहिजे इतकी ती आजही कालाजयी, प्रेरणा देणारी आणि कार्यप्रवण करणारी आहे.
सावित्रीबाईंचे आजपर्यंतचे उपलब्ध असलेले दोन काव्यसंग्रह आहेत. त्यातला पहिला काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह १८५४ मध्ये शीळाप्रेसवर छापून प्रसिध्द झाला. दुसरा काव्यसंग्रह १८९२ मध्ये प्रकाशित झाला, त्याचं नांव होतं ‘बावनकशी सुबोध-रत्नाकर’. त्यांच्या कवितांचे प्रकार म्हणजे त्यांत सामाजिक जाणीव, निसर्गवर्णन, आत्मपर, बोधपर, प्रार्थना अशा काव्यात्म कविता आपल्याला वाचायला मिळतात.
सावित्रीबाईंनी लिहिलेली ‘दृष्ट कवी’ ही कविता त्यांची एक अतिशय चांगली आणि समस्त कविमनाला भुरळ घालणारी कविता आहे.’कमळांचे महाल या कवितेत सावित्रीबाई म्हणतात,
‘काव्य मानस सुवासिक फुलांचे,
तिथे बांधितो महाल कमळांचे
चार विद्येची चौसष्ट कलांची,
सुबक नवरत्ने त्यावर रसाची
कधी कल्पी मी विश्व मित्र आहे,
काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे.
खरोखरच सावित्रीबाईंनी कवीच्या भाव-भावभावनांचा सूक्ष्म अभ्यास केला आहे हे जाणवते.
सर्वांना आपलेसे करून घेणारे, सर्व माझे, मी सर्वांचा अशी समरसतायुक्त भावना कित्येक कवींच्या मनामध्ये विलसत असते, त्याचा अनुभव आपणही घेत असतो. परंतू सावित्रीबाई ज्यावेळी हे सांगतात, तेव्हा त्याचे मोल अधिकच मनाला भावते. कवींबद्दल आपल्या कवितेतून इतकं सुंदर काव्य सावित्रीबाई करतात, त्यात आपलेपणाची भावना, आत्मीयता, आणि त्यातूनही सामाजिकतेची डूब पहायला मिळते.
‘खुळे काव्य व खुळा कवी’ या सावित्रीबाईंच्या एका कवितेत कवीमनाच्या गुढतेची, त्याच्या खुळेपणाची साक्ष देते. कवी विविध प्रकारचे अनुभव घेत असतो,
सुखदुःखे तो कथी भव्य
अनुभव घेतो स्वर्गाचा
भोग भोगतो नरकाचा
‘संसाराची वाट’ या त्यांच्या कवितेत त्या आपल्या पतीबद्दल-जोतिरावांबद्दल लिहिताना, त्यांच्या संघर्षशील आणि अनेक अडीअडचणीतून चाललेला संसारही सुखी झाला आहे, आनंदी झाला आहे. असा भाग्यवंत पती मिळाला, त्याबद्दल त्या मनोमन आनंदून गेल्या आहेत. सावित्रीबाईंच्या मनातील तरल भावनांचा प्रत्यय त्या त्यांच्या कवितेतून प्रकट होतो. त्या सांगतात,
माझ्या जीवनात जोतीबा स्वानंद
जैसा मकरंद कळीतला ||
करून प्रपंच | आहे तो कठीण
बोलून हा शीण | जाईल का?
प्रपंच करताना तो कठीण आहे असे म्हणून कोणी दूर गेले आहे काय? किंवा संसार करणे कठीण आहे असे वारंवार म्हटल्याने त्रास कमी मुळीच होणार नाही, असेच सावित्रीबाई आपल्याला सुचवतात. यातून त्यांची सकारात्मकता आपल्याला जीवन जगायला आणि संसार करायला बळ देते.
सावित्रीबाई त्यांच्या ‘माझी जन्मभूमी’ या नितांत रम्य अशा कवितेत आपल्या मूळ गावाबद्दल-नायगांवबद्दल लिहितात,
‘बारा बलुती, बारा अलुती कितीक जाती जमाती
शिवारात या सुखे नांदती
पाऊसपाणी छान पडतसे येती पिके सारी
विहिरीवर फळे फुले गोजिरी
गुलजार पक्षी गाती मनोहर फिरती फुलपाखरे
ऐसा निसर्ग तिथे वावरे
अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या जन्मभूमीत राहणारी माणसे ही मोठ्या आणि मोकळ्या मनाची आहेत. तिथला राजा हा खऱ्या अर्थाने ‘बळी राजा’ आहे.
बळीराजा थोर होई शेतकरी दानशूर
जणू माझी जन्मभूमी बळीचे कश्यपपूर ||
सावित्रीबाईंची ‘जाईचे फूल’, ‘पिवळा चाफा’, ‘फुलपाखरू व फुलाची कळी’ ‘मानव व सृष्टी’ तसेच मातीचा महिमा’ या निसर्ग कविता निश्चितच वाचनीय आहेत. मनाला भुरळ पाडणाऱ्या आहेत.
सावित्रीबाईंच्या सामाजिक कविताही तितक्याच मर्मग्राही आणि संवेदनशील आहेत आणि ते स्वाभाविकही आहे. सावित्रीबाईंच्या मनातील तरल भावनांचा प्रत्यय त्या त्यांच्या कवितेतून प्रकट होतो.
▪️डॉ. सुनिल दादोजी भंडगे▪️
(अध्यासन प्रमुख,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन)
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे