दिल्लीमधील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ईडीला हे समन्स अवैध असल्याचे सांगत चौकशीला हजार राहणार नसल्याचे उत्तर दिले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेले तिसरे समन्स देखील स्वीकारले नसल्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केजरीवालांवर जोरदार टीका केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना शहजाद पूनावाला म्हणाले,”आज पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे तिसरे समन्स नाकारले. म्हणजे नक्कीच त्यांनी काहीतरी लपवल्याचे दिसून येत आहे, म्हणूनच ते गुन्हेगारासारखे फरार झाले आहेत. मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांना या प्रकरणात न्यायालयाने अजून जामीन दिलेला नाही. तसेच पैशांची देवाणघेवाण झाल्याचे न्यायालयाने देखील मान्य केले आहे.” दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे.