आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये राजकीय भूकंप आला असून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला रेड्डी यांनी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याचे जाहीर केले आहे.
विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची आई मुलीच्या बाजूने आहे. वाय. एस. जगनमोहन रेड्डी कारागृहात असताना पक्षाची कमान सांभाळण्याचे काम शर्मिला रेड्डी यांनी केले होते. मात्र आता शर्मिला यांच्या बाहेर पडण्याने तिचा भाऊ आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांना मोठा धक्का बसू शकतो.शर्मिला या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आहेत.
तेलंगणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वायएस शर्मिला यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता.त्या निवडणुकीत काँग्रेसने प्रथमच ११९ पैकी ६४ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले होते. आता शर्मिला रेड्डी यांना सोबत घेत कॉंग्रेस दक्षिणेत आपले लक्ष केंद्रीत करत असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी वायएस शर्मिला यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते. पुढील वर्षी होणाऱ्या आंध्र प्रदेशच्या निवडणुकीतही शर्मिला यांची भूमिका अपेक्षित असेल.
वायएस शर्मिला काँग्रेसमध्ये सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना त्या म्हणाल्या आहेत की “आज मला वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करताना खूप आनंद होत आहे. मला खूप आनंद होत आहे की वायआरएस तेलंगणा पक्ष आजपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक भाग होणार आहे. काँग्रेस पक्ष आजही आपल्या देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे..