शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे शिंदेगटाचे नेते अमन परदेशी यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे यांच्या विरोधात भादवि कलम 295(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी वादग्रस्त शब्दप्रयोग केला होता. या शब्दप्रयोगांमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप अमन परदेशी यांनी केला आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि अमन परदेशी यांचा सहभाग असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी यापूर्वी केला होता. त्यावेळी दादा भुसे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. आता अमन परदेशी यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे शिवसेना उपनेते अद्वय हिरे जेलमध्ये असताना संजय राऊत यांच्यापाठोपाठ सुषमा अंधारे यांच्यावर देखील मालेगावात गुन्हा दाखल झाल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.