लखनौ : अयोध्या शहराला आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन शहर बनवण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील या नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम मोठ्या भक्तीभावात होणार आहे. तर या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देश-विदेशातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुणे अयोध्येत येण्याची शक्यता आहे. तर व्हीव्हीआयपी पर्यटकांसाठी सरकार स्वतंत्र व्यवस्था करत आहे.
अयोध्येला निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन शहर बनवण्यासाठी आता इलेक्ट्रिक कार सुरू करण्यात आल्या आहेत. व्हीव्हीआयपी पर्यटकांना आनंददायी प्रवास देण्यासाठी 12 इलेक्ट्रिक कार तैनात करण्यात आल्या आहेत. व्हीव्हीआयपींच्या स्वागतासाठी अयोध्या कैंट रेल्वे स्टेशन, अयोध्या धाम जंक्शन, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या येथे या सर्व 12 इलेक्ट्रिक कार पार्क केल्या आहेत.
राममंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांसाठी या इलेक्ट्रिक गाड्या दिल्या जातील. अयोध्येत आता तुम्हाला सर्वत्र इलेक्ट्रिक कार मिळू शकतात. सध्या ताफ्यात 12 कार आहेत ज्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे बुकिंगसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती दिलीप पांडे, अयोध्येतील इलेक्ट्रिक कार टॅक्सी सेवेचे स्थानिक पर्यवेक्षक यांनी दिली आहे.
22 जानेवारीपर्यंत आणखी गाड्या आणल्या जातील. या इलेक्ट्रिक कार राम जन्मभूमी, सूरज कुंड, सूर्यू नदी, भारत कुंड इत्यादी सर्व धार्मिक केंद्रांना भेट देण्यास मदत करतील. या इलेक्ट्रिक कारचे भाडे 10 किमीसाठी 250 रुपये पासून सुरू होईल. 20 किलोमीटरसाठी 400 रुपये आणि 12 तासांसाठी 3000 रुपयांपर्यंत घेतले जाईल, असेही दिलीप पांडेंनी सांगितले आहे.
काही दिवसांनंतर पर्यटकांसाठी अयोध्येत आणखी अनेक इलेक्ट्रिक कार तैनात केल्या जातील. या इलेक्ट्रिक गाड्या अयोध्येतील खास ठिकाणी तैनात केल्या जातील. तसेच या सर्व इलेक्ट्रिक कार मोबाईल अॅपला जोडल्या जातील. त्यामुळे पर्यटकांना त्यांच्या मोबाईल अॅपद्वारे सहजपणे इलेक्ट्रिक कार बुक करता येणार आहेत.
अयोध्या कॅंट स्थानकात येणाऱ्या लोकांसाठी भारतात निर्मित इलेक्ट्रिक कारची चाचणी सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांनाही त्यांचे अनुभव सांगण्यास सांगितले जाईल. तसेच अयोध्या रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांनी अयोध्येच्या विकासाचे तसेच त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या प्रवासाचे कौतुक केले आहे.