राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरामध्ये प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्याविरुद्ध आंदोलन केले जात आहे. यातच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी,आचार्य सत्येंद्र दास आव्हाडांनी केलेल्या विधानाचे जोरदार खंडन केले आहे.
पक्षाच्या शिबिरामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ”राम आमचा आहे. राम बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही सर्व जण आम्हाला शाकाहारी बनवायला जाता, मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो म्हणून आम्ही मटण खातो. हाच आहे रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता.१४ वर्षे जंगलात राहणार व्यक्ती शाकाहारी भोजन शोधायला कुठे जाणार?” असे वादग्रस्त विधान केले होते. आव्हाडांच्या या विधानाचा नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी देखील चांगलाच समाचार घेतला आहे.
आव्हाडांच्या या विधानावर बोलताना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी, आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, ”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड जे बोलत आहेत ते, पूर्णपणे खोटे आहे. प्रभू राम यांनी वनवासात असताना मांसाहार केल्याचे आपल्या धर्मग्रंथात कुठेही लिहिलेले नाही. तर ते फळे खायचे.” आव्हाडांच्या वक्तव्यावर सत्येंद्र दास यांनी असहमती दर्शवत ते म्हणाले, ” अशा खोट्या माणसाला आमच्या प्रभू श्रीरामाचा अपमान करण्याचा अधिकार नाही. आमचा देव नेहमीच शाकाहारी होता. ते आमच्या प्रभू श्रीरामाचा अपमान करण्यासाठी अपमानास्पद शब्द बोलत आहेत.