दिल्लीमधील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ईडीला हे समन्स अवैध असल्याचे सांगितले आहे. ईडीने मला पाठवलेले समन्स हे ”खोटे समन्स” असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. तसेच हे समन्स कसे बेकायदेशीर आहे हे त्यांनी ईडीला सांगितले आहे. तसेच ते म्हणाले, ”प्रामाणिकता” हीच माझी सर्वात मोठी ताकद आणि संपत्ती आहे.
आज (गुरूवारी)पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ”गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपच्या सर्व यंत्रणांनी अनेक छापे मारले, मात्र एक रुपयाही त्यांना सापडला नाही. भ्रष्टाचार झाला असेल तर पैसे कुठे आहेत? खोट्या आरोपांखाली आम आदमी पक्षाच्या नेते तुरुंगात आहेत. आता भाजपाला मला अटक करायची आहे. मात्र प्रामाणिकता हीच माझी सर्वात मोठी ताकद आणि संपत्ती आहे.” २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेल्या नोटिशीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून भारतीय जनता पार्टी मला अडवू इच्छित आहे असे केजरीवाल म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, ”ईडीने पाठवलेले समन्स हे बेकायदेशीर असल्याचे मला माझ्या वकिलांनी सांगितले. त्याबाबत मी बेकायदेशीर समन्सचे पालन करावे का? असा प्रश्न ईडीकडे केला आहे. कायदेशीर समन्स आल्यास मी त्याचे पालन करेन. आठ महिन्यांपूर्वी मला सीबीआयने बोलावले होते. मला जाते ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखू इच्छितात.” तसेच मी नेहमीच देशासाठी लढत आलो आहे आणि शेवटपर्यंत देशासाठी लढत राहणार आहे. ”आज ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपामध्ये समाविष्ट करून घेतले जात आहे. जो कोणी त्यांच्या पक्षात जातो , त्यांची सर्व प्रकरणे निकाली लागतात. आज मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि विजय नायर यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. आपण सर्वानी मिळून देशाला वाचवायचे आहे. त्यांच्या विरोधात मी मनापासून लढा देत असून, मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.” असे ते म्हणाले.
दरम्यान, बुधवारी ईडीकडून आलेले तिसरे समन्स मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाकारले. दिल्लीमधील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्या वर्षी २२ डिसेंबर रोजी तिसरे समन्स पाठवून ३ जानेवारी रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते.