पाकिस्तान हा सध्या महागाईच्या झळा सोसत आहे. पाकिस्तानमधील प्रत्येकालाच वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. विजेच्या दराबरोबरच इतरही गोष्टींच्या किंमती वाढताना दिसून येत आहेत. आता पुन्हा एकदा पाकिस्तानमधील कराची येथे विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. पाकिस्तानचे वीज नियामक प्राधिकरण असलेल्या नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युलेटरी अथॉरिटी (NEPRA) ने K-Electric च्या ग्राहकांसाठी एकाच आठवड्याच्या आतमध्ये २.८७ पाकिस्तानी रुपये प्रति युनिट अशी दरवाढ केली आहे. नेप्राने या वीज दरवाढीला मंजुरी दिल्याने नागरिकांना पुन्हा एकदा विजेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत तीन महिन्यांच्या दराचा भाग म्हणून काराचीमधील पॉवर युटिलिटीने केलेल्या विनंतीवरून ही दरवाढ करण्यात आली आहे. तसेच हा निर्णय अधिसूचनेसाठी सरकारकडे पाठवण्यात आला आहे. नेप्रा कंपनीने २९ डिसेंबर रोजी जानेवारी ते मार्च २०२३ या त्रैमासिक समायोजनासाठी PKR मध्ये १.२५ प्रति युनिट ही दरवाढ मंजूर केली आहे. याबाबतचे वृत्त Dawn न्यूजने दिले आहे.
या दरवाढीमुळे कराची येथील नागरिकांना आता एका युनिट विजेसाठ ४.१२ पाकिस्तानी रुपये मोजावे लागणार आहेत. वारंवार विजेच्या दरामध्ये वाढ होत असल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. के-इलेक्ट्रिकचे डायरेक्टर कम्युनिकेशन्स आणि प्रवक्ते इम्रान राणा म्हणाले, नेप्राने जानेवारी ते मार्च २०२३ साठी हा निर्णय घेतला आहे. देशभरामध्ये लागू असलेल्या एकसारख्या दर धोरणानुसार, QTA चा परिणाम हा सामान्यतः ग्राहकांवर होत नाही. यावर औपचारिक निर्णय घेतला जाईल. पॉवर सेक्टर रेग्युलेटरने सांगितले की, या दर वाढीचा उद्देश तिमाही दर योजनेशी संबंधित असलेले बॅकलॉग दूर करणे आणि देशामध्ये एकसमान धोरण व नियामक व्यवस्था लागू करणे हा आहे.
दरम्यान, या झालेल्या दरवाढीवर व्यापारी समूहातील काही प्रतिनिधी असलेल्या व्यक्तींनी देखील आपले मत व्यक्त केले. विजेच्या दरात सतत होणाऱ्या वाढीमुळे कराचीमधील उद्योगांना नुकसान सोसावे लागत आहे. तसेच वाढलेल्या विजेच्या दरामुळे भविष्यात उत्पादन केले जाणाऱ्या वस्तूंची किंमत वाढतील याबाबत त्या प्रतिनिधींनी भाष्य केले.