जैन आणि बौद्ध परंपरेत अयोध्येचे महत्व
अयोध्या नगरीतील शरयू नदीच्या काठावरचा परिसर जैन धर्मियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण जैन पंथातील २४ तीर्थंकरांपैकी पहिले तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेव यांच्यासह अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ व अनंतनाथ अशा एकूण पाच तीर्थंकरांचा जन्म अयोध्येत झाला असे जैन ग्रंथ सांगतात. दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही जैन पंथांचे मठ व प्रशाला अयोध्येमध्ये होत्या. आदिनाथ ऋषभदेव यांचे एक भव्य मंदिर अयोध्येत होते. मोहम्मद घोरी याचा धाकटा भाऊ मकदूम शाह जूर्रन घोरी याने इसवी सन ११९२-११९३ मध्ये अयोध्येवर हल्ला केला. तो अयोध्या जिंकू शकला नाही परंतु त्याने आदिनाथ मंदिर उद्ध्वस्त केले. या युद्धामध्ये तो देखील तेथेच मारला गेला असावा, कारण आजही अयोध्येमध्ये शाह जूर्रन का टिला या नावाने त्याची कबर पाहायला मिळते.
जैन धर्मियांची पवित्र व महत्त्वाची असलेली अयोध्येतील अनेक स्थाने मुसलमानी आक्रमणात नष्ट झाली व त्या ठिकाणी तेच सामान वापरून दर्गे किंवा मशिदी उभा राहिल्याचे अनेक पुरावे आजही सापडतात. अनेक जैन मंदिरे उद्ध्वस्त होऊन देखील काही महत्त्वाची जैन मंदिरे आजही अयोध्येत आहेत. जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर अयोध्येत येऊन गेले व त्या परिसरात त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार केला असे दाखवणारे अनेक पुरावे जैन ग्रंथामध्ये उपलब्ध आहेत. जैन आचार्य जिनप्रभसूरी यांच्या विविध तीर्थ कल्प या ग्रंथात अयोध्येचे वर्णन आले आहे. आचार्य जिनसेन हे आपल्या आदिपुराण या ग्रंथात ‘शत्रूंना जिथे युद्ध करणे शक्य नाही ती अयोध्या’ असे वर्णन करतात. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात आचार्य विमलसुरी यांनी पउमचरियं हा प्राकृत ग्रंथ लिहिला. प्रभू रामचंद्रांना पद्म या नावाने जैन पंथात ओळखले जाते. या पद्म शद्बाचाच प्राकृत भाषेत उच्चार पउम असा होतो. पुढच्या काळात पद्मचरितं, उत्तरपुराण, जैन रामायण, रामपुराण, हे राम कथा सांगणारे ग्रंथ जैन पंथामध्ये मान्यताप्राप्त झाले. जैन परंपरा प्रभू रामचंद्रांना चक्रवर्ती असे म्हणून आपल्या अनंत श्रेष्ठ अशा ६३ शलाका पुरुषांपैकी एक मानते. जैन ग्रंथकारांनी अनेक ग्रंथांमध्ये अयोध्या नगरी व प्रभू रामचंद्रांचा अत्यंत श्रद्धापूर्वक उल्लेख केला आहे.
जैन पंथाप्रमाणेच बौद्धांच्या दृष्टीनेही अयोध्या हे महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धर्मग्रंथांमधील वेगवेगळ्या उल्लेखांवरून गौतम बुद्ध इ. स. पू. ५६३ ते इ. स. पू. ४८३ या काळात अयोध्या परिसरात किमान ६ ते १९ वर्षे राहिले असे लक्षात येते. त्या काळात अयोध्येचा राजा पसेनदी हा गौतम बुद्धांचा कट्टर अनुयायी होता. त्या काळात बौद्ध पंथाचे अयोध्या व श्रावस्ती हे महत्त्वाचे केंद्र होते. अयोध्येत अनेक बौद्ध मठ व पाठशाळा होत्या. बौद्धांच्या महायान व हीनयान या दोन्ही पंथांचे मठ तिथे होते.
गौतम बुद्धांनी आपल्या शिष्याला केलेल्या उपदेशातील फेनसूक्त व दारूक्खंधसूक्त या दोन महत्त्वाच्या सुक्तांचे निरूपण अयोध्येत केले असे सांगितले जाते.
भगवान बुद्धांचा या शहरांशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता, म्हणूनच मज्झिमनीकाय या ग्रंथात त्यांना उद्देशून कोसलक हा शद्ब वापरलेला आहे. गौतम बुद्धांच्या अंतिम काळाचे वर्णन करणाऱ्या महापरिनिब्बान सुक्तामध्ये असे नोंदवले आहे, की गौतम बुद्धांच्या अंतिम काळात आनंद नावाचा एक शिष्य त्यांच्याजवळ होता. हा आनंद गौतम बुद्धांना विनंती करतो, की ह्या जगाचा त्याग करायचाच असेल तर अयोध्या किंवा वाराणसीला चला.
भारतात येऊन गेलेल्या तिबेटी बौद्ध भिक्खूंनी तसेच अनेक परदेशी प्रवाशांनी अयोध्या नगरी व बौद्ध पंथाचा संबंध आपल्या अनेक ग्रंथातून सांगितला आहे. बौद्ध धर्म व तत्वज्ञानाच्या अभ्यासाचे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून अनेक बौद्ध भिक्खू अयोध्येला भेट देत असत. गौतम बुद्धांच्या संबंधाने आजही अयोध्येत अनेक श्रद्धास्थाने दाखविली जातात. एक कथा अशी सांगितली जाते, की भगवान गौतम बुद्धांनी एका सकाळी दात घासताना वापरलेली काडी – दंतकाष्ठ एका ठिकाणी रोवून ठेवली होती. ती तिथे रुजली व काही काळाने तिचे झाड झाले, मात्र हे झाड कधीही आठ-दहा फुटांपेक्षा उंच वाढले नाही. या झाडाचा उल्लेख अनेक बौद्ध लिखाणांमध्ये आलेला आहे. आजही अयोध्येत दातून का टिला किंवा दतियाकुंड अशा जागांचा उल्लेख केला जातो. दंतधावन मठ या नावाचे एक स्थान देखील अयोध्येत आजही अस्तित्वात आहे. बौद्ध जातक कथांमध्ये रामायणातील अनेक व्यक्तिरेखांना महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. अनामक जातक नावाच्या एका जातक ग्रंथाच्या चिनी अनुवादामध्ये तर प्रभू रामांचा उल्लेख बोधिसत्त्व म्हणून केलेला आहे. गौतम बुद्ध हे पूर्व जन्मात श्रीराम होते असे वर्णन या जातक ग्रंथात केलेले आहे. श्रीराम व गौतम बुद्ध हा संबंध भारतात ऐकलेल्या व वाचलेल्या अनेक धारणांमधून आलेला आहे.
जैन व बौद्ध पंथियांमध्ये अयोध्येचे महत्त्व हे प्राचीन काळापासून असल्याचे स्पष्ट होते. अयोध्या ही नगरी हिंदू धर्मियांप्रमाणेच जैन व बौद्ध पंथीयांसाठी देखील तेवढीच पवित्र व श्रद्धेय अशीच आहे.
– डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे