कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून येत्या ७ जानेवारीला रत्नागिरी धावनगरी होणार आहे. या ५, १० आणि २१ किमी (हाफ मॅरेथॉन) स्पर्धेकरिता सुमारे १५०० जणांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी विवा एक्झिक्यूटीव्ह येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या मॅरेथॉनमध्ये ४० टक्के धावदूत महाराष्ट्र आणि देशभरातील आहेत. पर्यटन, रत्नागिरी डेस्टिनेशन व्हावे या सुहेतूने मॅरेथॉन प्रभावशाली होण्याकरिता चोख नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे, असेही श्री. देवस्थळी यांनी सांगितले.
ते म्हणाले, या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय तसेच उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून बहुमोल सहकार्य मिळाले आहे. बॅंक ऑफ इंडिया, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, ब्रूक्स, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, एमआर असोसिएशन आदींचे योगदान लाभत आहे. डिसेंबर २०२२ पासून ही मॅरेथॉन करण्यासाठी मेहनत घेण्यात येत होती. त्याकरिता राज्यभरातील १२ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये आयोजकांनी भाग घेऊन तेथील नियोजनाची माहिती घेतली. त्यानुसार येथे नियोजन केले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या धावपटूंनी आधीच सर्व हॉटेल्स आरक्षित केली आहेत. भाट्ये येथे स्पर्धकांना परत नेण्याकरिता रिक्षाचालक संघटनेशी चर्चा झाली असून त्या माध्यमातूनही रिक्षाचालकांना फायदा होणार आहे, असे देवस्थळी म्हणाले.
बोर्डिंग रोड येथील तारांगण येथे शनिवारी (दि. ६ जानेवारी) सकाळी १० ते ६ या वेळेत स्पर्धकांना बिब (नंबर) देण्यात येणार आहे. सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्व विजेत्यांना मिळून साधारण २ लाखांहून अधिक रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला आंब्याच्या आकारातील मेडल मिळणार आहे, असेही श्री. देवस्थळी यांनी सांगितले.
ही स्पर्धा थिबा पॅलेस रोडवरील हॉटेल मथुरा येथून सुरू होईल. २१ किलोमीटरसाठी सकाळी ६ वाजता झेंडा दाखवण्यात येईल. धावपटू नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप येथून धावून आल्यानंतर भाट्ये येथे समारोप होईल. १० किमीसाठी ६.१५ वाजता झेंडा दाखवून सुरवात होईल. नाचणे, शांतीनगर व वळसा मारून मारुती मंदिर मार्गे भाट्ये येथे पोहोचतील. ५ किमीची स्पर्धा ६.५० वाजता सुरवात होईल. मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाट्यापर्यंत स्पर्धक येतील.
ही स्पर्धा समस्त रत्नागिरीकरांची आहे. अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून योगदान करत आहेत. या स्पर्धेकरिता जिल्हा पोलीस व वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभणार आहे. नाचणे, जेल रोड येथील एकाच रस्त्यावरून दुतर्फा वाहतूक वळवण्यात येणार आहे. सुरवातीला एम फिटनेस आणि फिटनेस मंत्राच्या माध्यमातून झुंबा डान्स घेतला जाणार आहे. सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या स्पर्धेच्या मार्गावर हायड्रेशन पॉइंट ठेवले आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य रूट सपोर्ट करणार आहेत, आरोही फिजिओथेरपीतर्फे फिजिओथेरपिस्ट उपलब्ध असतील. डॉक्टर, परिचारिकांसह ४ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्या त्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ, विद्यार्थी आगळ्या वेगळ्या पद्धतीने धावदूतांचे स्वागत करणार आहेत.
स्पर्धेपूर्वी १०० दिवस आधी म्हणजे २ ऑक्टोबरला थिबा पॅलेस येथे दर रविवारी वॉर्म अप, प्रॅक्टिस रन आयोजित केली. पहिल्या दिवशी २५ जण व ३१ डिसेंबरच्या प्रॅक्टिस रनच्या दिवशी जवळपास २०० धावपटू प्रॅक्टिसला उपस्थित होते. रत्नागिरीकर धावू लागले आहेत, फिटनेसकरिता त्यांनी लक्ष दिल्याचे दिसून येऊ लागले असून धावनगरी रत्नागिरी होण्याची ही आता एक चळवळ झाली आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेला रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सेक्रेटरी संदीप तावडे, डॉ. नितीन सनगर, हॉटेल असोसिएशनचे महेश सावंत, सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत, सचिन नाचणकर, आशीष पावसकर उपस्थित होते.