राजस्थानमधील जयपूर येथे ५ जानेवारी म्हणजेच आजपासून ७ जानेवारीपर्यंत राजस्थान इंटरनॅशनल सेंटरमध्ये महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची तीन दिवसीय वार्षिक अखिल भारतीय परिषद होणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत (AI) आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा,दहशतवादविरोधी, डाव्या विचारसरणीचा अतिरेक आणि अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या आव्हानांवर चर्चा केली जाणार आहे.
डीजीपी आणि आयजीपी यांच्या इंटरनॅशल परिषदेबाबत अधिकृत निवदेन जाहीर करण्यात आले आहे. त्या निवदेनामध्ये, ”५ ते ७ जानेवारी दरम्यान, आयोजित या परिषदेमध्ये सायबर गुन्हे, पोलिसिंगमधील तंत्रज्ञान, दहशतविरोधी आव्हाने, डाव्या विचारसरणीचा अतिरेक आणि तुरुंगातील सुधारणांसह पोलिसिंग आणि अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाईल.” असे सांगण्यात आले आहे. तसेच या परिषदेत AI, डीपफेक इत्यादींसारख्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे निर्माण होणारी आव्हाने,त्या आव्हानांना सामोरे कसे जायचे, सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात काय केले पाहिजे यावर देखील चर्चा केली जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. या परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृह राज्य मंत्री, कॅबिनेट सचिव, भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील पोलीस महासंचालक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस प्रमुख देखील यांच्यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत.
५८ व्या डीजीपी आणि आयजीपी राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सहभागी होणार आहेत. त्यांच्या येण्याआधी भारतीय जनता पक्षाचे जयपूर येथील कार्यालय सजवण्यात आले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानच्या भाजपच्या मुख्यालयात भेट देण्याची शक्यता आहे. तसेच त्यावेळी ते तिथे कार्यकर्ते, नेत्यांना संबोधित करू शकतात. यानिमित्ताने त्यामुळे जयपूर येथील भाजपाच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.