नवी दिल्ली : काल (4 जानेवारी) संध्याकाळी आफ्रिकेमधील सोमालिया देशाच्या किनारपट्टीवर ‘एमव्ही लीला नॉरफोक’ (MV LILA NORFOLK) या मालवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरण झालेल्या या जहाजात 15 भारतीय सदस्य काम करत होते. तर अपहरणाची माहिती मिळताच भारतीय नौदलाने बचावाची तयारी केली आहे. त्यामुळे आता नौदलाच्या विमानांकडून अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या भागाचे निरीक्षण केले जात आहे. तसेच अपहृत जहाजाशी संपर्क साधला गेल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या जहाजाच्या दिशेने भारतीय नौदलाची एक युद्धनौका निघाली आहे. अपहरण झालेल्या जहाजाच्या सभोवतालच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ही युद्धनौका रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय नौदलाचे ऑपरेशन सुरू झाले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या जहाजाने गुरूवारी रात्री 5 ते 6 शस्त्रधारी हल्लेखोर जहाजावर आले असल्याचा संदेश नौदलाला पाठविला होता. तसेच लायबेरियाचा झेंडा असलेल्या या ‘एमव्ही लीला नॉरफोक’ या मालवाहू जहाजावर अरबी समुद्रातून जात असताना हल्ला झाला. तर जहाजाचा संदेश मिळाल्यानंतर INS चेन्नई ही युद्धनौका रवाना करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मालवाहू जहाजांवरील हल्ले वाढले आहेत. 23 डिसेंबर रोजी अरबी समुद्राच्या पोरबंदर किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या एका वाणिज्य जहाजावर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. या जहाजामध्ये 21 भारतीय सदस्य काम करत होते.