नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गेल्या दोन दिवसांत गौतम अदानी यांच्या संपत्तीत 7.67 अब्ज रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अदानींची एकूण संपत्ती $97.6 अब्ज झाली आहे. तर आता मुकेश अंबानी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून त्यांची एकूण संपत्ती $97 अब्ज आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्यामुळे जगातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांची रँकिंगही सुधारली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी हे 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. तसेच त्यांनी या क्रमवारीत मुकेश अंबानींना देखील मागे टाकले आहे. या यादीमध्ये मुकेश अंबानी 12 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर घसरले आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्याशिवाय इतर दोन भारतीय उद्योगपतींनीही जगातील 50 अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये शापूर मिस्त्री 34.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 38 व्या क्रमांकावर आहेत. तर आयटी सेवा प्रदाता एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक शिव नाडर $33 अब्ज संपत्तीसह 45व्या क्रमांकावर आहेत.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गौतम अदानींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे अदानी समूहाचे एकूण मार्केट कॅप 15.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.