भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) ने आपल्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. इस्रोने आपल्या कक्षेमध्ये १०० W क्लास पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युएल सेल आधारित पॉवर सिस्टम (FCPS) ची PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल-3 ची यशस्वी चाचणी केली आहे. १ जानेवारी रोजी पोलर सॅटेलाईट व्हेईकल ((PSLV) C58 लॉन्च करण्यात आले होते. हा प्रयोग अंतराळातील पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन इंधन सेलचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाणार आहे. या प्रयोगासाठी याचे लॉन्चिंग एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. इस्रोने आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, या प्रयोगाचा प्राथमिक उद्देश डेटा गोळा करणे आहे. जो भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी एक डिझाईन तयार करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. POEM3 च्या चाचणी दरम्यान, पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युएल सेलने उच्च दाब वाहिन्यांमध्ये असलेल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूंचा वापर करून १८० वॅटची शक्ती निर्माण केली.
इस्रोने केलेल्या चाचणीमुळे भरपूर प्रमाणात डेटा प्राप्त झाला आहे. पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन इंधन सेल वीज निर्मितीसाठी थेट हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूंचा वापर करतात. याबरोबरच शुद्ध पाणी आणि उष्णता देखील निर्माण होते. PSLV-C58 च्या ऑर्बिटल प्लॅटफॉर्मवर इंधन सेलची यशस्वी चाचणी अंतराळ तंत्रज्ञानामध्ये पुढे जाण्यासाठी व भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी शाश्वत उपाय शोधण्यास अत्यंत मदतशीर ठरणार आहे.