मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’ साठी निर्माती म्हणून नव्या भूमिकेत पाऊल ठेवले आहे. पंचक चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर 12 डिसेंबर 2023 रोजी माधुरीच्या YouTube चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. तसेच राहुल आवटे आणि जयंत जठार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रभावी कलाकारांचा समावेश आहे. तर आजपासून (5 जानेवारी) हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.
पंचक या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, गणेश मयेकर आणि आरती वडबाळकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
तर या चित्रपटाचा ट्रेलर ज्यांनी पाहिला आहे त्यांना कथेचा अंदाज आला असेलच. पंचक चित्रपटाची संपूर्ण कथा कोकणात घडते. कोकणामध्ये खोतांचे मोठे कुटुंब असते. या कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीचे निधन होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दु:खात असते. तर त्यावेळी घरात भटजी येतात आणि ते पंचक लागल्याचे सांगतात. त्यामुळे घरातील सगळ्यांची घबराट होते. आता त्या ज्येष्ठ व्यक्तीनंतर कोणता सदस्य मृत्यूमुखी होणार, अशी धाकधूक सगळ्यांच्या मनात निर्माण होते. त्यानंतर सुरू होतो तो श्रद्धा-अंधश्रद्धेचा खेळ. तर आता हा खेळ कंटाळवाणा ठरतो की मनोरंजन करतो हे तुम्हाला पंचक पाहिल्यानंतरच कळेल.
गेल्या काही दिवसांपासून पंचक या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसह अनेक ठिकाणी मुलाखत देताना दिसत आहे. तर काल या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरीने पतीसह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी माधुरीच्या चाहत्यांनी मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान, आता माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो? आणि तो बॉक्स ऑफिसवर किती काळ टिकतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.