लॉस एंजेलिस : ब्रिटीश अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर ग्लिनिस यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती, व्यवस्थापक मिच क्लेम यांनी दिली. ग्लिनीस यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
ग्लिनिस जॉन्स यांनी 1938 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पण 10 वर्षांनंतर त्यांनी ‘मिरांडा’ मध्ये जलपरी साकारली तेव्हा त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्या ‘मेरी पॉपिन्स’ मधील ‘विनिफ्रेड बँक्सच्या’ भूमिकेमुळे चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या. तसेच ग्लिनिस यांनी 60 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. तर ग्लिनिस यांना ‘व्हाईल यू वेअर स्लीपिंग’ आणि ‘द सनडाउनर्स’ साठी ऑक्सर नामांकन मिळाले होते.
ग्लिनिस यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. ग्लिनिस जॉन्सला एक मुलगा होता, ज्याने त्यांच्या आधी या जगाचा निरोप घेतला होता. त्यामुळे त्या अनेकदा दु:खी असायच्या.
दरम्यान, ग्लिनिस यांचे व्यवस्थापक क्लेम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ग्लिनिस यांनी बुद्धि, बुद्धिमत्ता आणि अभिनयाच्या जोरावर प्रेमाने लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. जॉन्सचा प्रकाश 100 वर्षे सतत चमकत राहिला आहे. पण आज हॉलिवूडसाठी दुःखाचा दिवस आहे. आमच्या लाडक्या ग्लिनिसच्या निधनाने आम्ही फक्त दुःखी झालो नाही तर एका सुवर्णयुगाच्या समाप्तीबद्दल शोकही व्यक्त करत आहोत.