श्रीराम समर्थ
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला |
जयाने सदा वास नामात केला ||
जयाच्या मुखी सर्वदा नाम किर्ती |
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती ||
महाराष्ट्रातील संत परंपरेतील नाम महिमा आपल्या अमृतवाणीने सर्वांपर्यंत पोहोचवणारे श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची आज पुण्यतिथी. “केशवं प्रती गच्छती” या उक्तीप्रमाणे सर्व उपासना पद्धती आणि संप्रदाय यांना स्मरून आजचे हे शब्दसुमन श्री. सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न, मनातील हे विचार हे सुद्धा श्री. महाराजांचीच कृपा. वेदशास्त्र, संस्कृत यामध्ये बंदिस्त असणारे अध्यात्म हे फक्त नामस्मरणाच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने व आपल्या मृदू वाणीने अवघ्या भारतभर प्रसारणाऱ्या श्री. महाराजांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले या गावी झाला. घरात सात पिढ्यांची पंढरीची वारीची परंपरा होती. गोंदवल्याचे कुलकर्णी असणारे रावजी व गीतामाई या दाम्पत्यापोटी माघ शुद्ध द्वादशी, शके १७६६ म्हणजेच इ.स. १९ फेब्रुवारी १८४५ मध्ये श्री. महाराजांचा जन्म झाला. श्री. महाराजांचे पाळण्यातील नाव गणपती असे होते. भगवभ्दजनाची आत्यंतिक आवड यावरून त्यांचे भविष्यातील मार्गक्रमणाची कल्पना येत होती. मुंज झाल्यानंतर श्री. महाराजांनी उपाध्यायांकडून सर्व विद्या अल्पावधीतच ग्रहण केली. अध्यात्माची आणि गुरुशोधाची ओढ वाढत होती, आणि त्यातूनच त्यांनी कुटुंबाचा त्याग करून पलायन केले, पण त्यांचा हा प्रयन विफल झाला. प्रयत्न विफल झाला, तरी त्यांची गुरुशोधाच्या इच्छेत फारसा फरक पडला नाही, दिवसेंदिवस त्याची गुरुप्राप्तीची ही ओढ वाढत गेली. अशातच आपल्या आईच्या इच्छेखातर त्यांनी अकराव्या वर्षी विवाह केला, पण मन काही संसारात रमले नाही.
यानंतर श्रीमहाराजांनी श्रीरामनामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रापंचिकांना पेलेल असा परमार्थमार्ग दाखविण्याचे कार्य अधिकच जोराने केले. सदाचार, नामस्मरण, सगुणोपासना, अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेमभाव, यांवर त्यांचा विशेष भर होता. सन १८९० पासून श्रींचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदवले येथेच राहिले. त्यांच्याकडे येणा येणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या खूपच वाढली. या सर्वांना सगुणोपासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम, सीता व लक्ष्मण, तसेच मारुती, यांची स्थापना केली. श्री. महाराजांनी एक दत्तमंदिर व एक धर्मशाळा’ बांधून नाम साधकांच्या निवासाची सोय केली. शिवाय, जागोजागी नामाची उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी रामदिरांची स्थापना केली, श्रीमहाराजांनी इ. स. १९०१ मध्ये मातुःश्री गीताबाई व अनेक भक्तमंडळी यांसह काशीयात्रेसाठी प्रयाण केले. इ. स. १८७६ व १८९६ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्रीमहाराजांनी आपल्या शेतावरच नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरविले आणि उपासमारीपासून वाचविले.
श्रीमहाराज हे पूर्णत्वाप्रत पोहोचलेले संत होते यात शंका नाही. देहबुद्धी मूळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात, विचारात आणि उच्चारात चुकून देखिल मी पणा व माझेपणा दिसायचा नाही, हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय. अर्थात स्वतःबद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती. प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र ! प्रापचिकाच्या प्रत्येक आध्यात्मिक शकिचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते. प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असताना त्यांना अकारण निंदा, अपमान, छळ व कमीपणा सोसावा लागला. तरी देखील सर्वांनी भगवंताच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असेतोपर्यंत त्यांनी प्रयत्र केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व देवून असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला. भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्रीमहाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले, नामाचा प्रसार केला. आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविले. श्रीमहाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चितिले, काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काहीच सत्य मानले नाही.
सोमवार, मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १८३५, (इ.स.२२ डिसेंबर १९१३) या दिवशी, पहाटे ५.५५ वाजता जेथे नाम, तेथे माझे प्राण’ ही सांभाळावी खूण हे शेवटचे शब्द उच्चारून, या महापुरुषाने आपला देह ठेवला. माणदेशीचा नामयोगी, अध्यात्मसूर्य मावळला. श्रद्धापूर्वक केलेले त्रयोदशाक्षरी रामनामाचे नित्यस्मरण
श्रीसगुरुचरणारर्पणमस्तू !
जय जय रघुवीर समर्थ.’
अजय चंद्रकांत धुमाळ,
भोर
संदर्भ : श्री ब्रहमचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र