डॉ. वीणा देव, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे दि. ४ – राष्ट्र निर्माण कार्यात महिलांचाही मोलाचा सहभाग आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन महिलांची परिस्थिती, महिलांचा देशकार्यातील सहभाग या बाबत विचार करावा, त्यांचे वैचारिक आदान प्रदान व्हावे आणि विविध विषयावर वैचारिक मंथन व्हावे या उद्देशाने कर्मयोगिनी व संवर्धिनी नावाने महिला संमेलनांचे आयोजन पुण्यात दोन ठिकाणी करण्यात आले आहे.
गाथा कर्तृत्वाची गाथा स्त्री सामर्थ्याची,
महिलांनी मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या सर्वच जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःला सक्षमपणे सिद्ध केले आहे. नोकरी व्यवसाय आणि कुटुंब यांची सांगड घालताना महिलांची भूमिका नेहमीच मोलाची ठरली आहे. या महिलांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील शक्तींना चालना मिळावी आणि त्यांच्यात वैचारिक आदान प्रदान व्हावे हेच या संमेलनाचे मूळ उद्दिष्ट आहे. या संमेलनात महिलांचे विविध प्रश्न, समस्या व त्यावर उपाय योजना यावर मंथन होईल. तसेच महिलांचा राष्ट्र निर्माण कार्यातील सहभाग कसा असावा याचा ही आढावा घेतला जाईल. तसेच तज्ज्ञ, अनुभवी वक्त्यांच्या मार्गदर्शनाने महिलांच्या कार्यास या संमेलनातून प्रेरणा मिळेल. ‘स्व’ पासून ते ‘राष्ट्र’ उन्नतीच्या परिघापर्यंत केंद्रस्थानी असलेल्या महिलांच्या कार्यास हे संमेलन दिशादर्शक ठरणार आहे.
अशी माहिती संमेलनाच्या संयोजिका सुजाता कृष्णकांत सातव व सारिका वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अखिल भारतीय अधिकारी डॉ. अंजली देशपांडे व पश्चिम महाराष्ट्र प्रांत संमेलन सहसंयोजिका अॅड. अपर्णा नागेश पाटील उपस्थित होत्या.
जनसेवा न्यास , हडपसर आयोजित “कर्मयोगिनी” हे वडगावशेरी – हडपसर आणि येरवडा भागातील महिलांसाठीचे हे महिला संमेलन महालक्ष्मी लॉन्स, पुणे – नगर रोड, येथे होणार आहे तर दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र आयोजित सिंहगड – पर्वती आणि कात्रज परिसरातील महिलांचे ‘संवर्धिनी’ संमेलन ७ जानेवारी
२०२४ याच दिवशी गणेश कला क्रीडा मंच,स्वारगेट येथे होणार आहे. ही दोन ही संमेलने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यन्त संपन्न होतील.
स्वदेश, स्वसंस्कृती आणि स्वत्व जपत प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी येत्या रविवारी दि. ७ जानेवारी २०२४ रोजी कर्मयोगिनी
महिला संमेलनाचे आयोजन सकाळी १० ते सायं. ५ यावेळेत महालक्ष्मी लॉन्स येथे केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यावेळी प्रमुख पाहुण्या तर स्काईडाइवर, खेळाडू पद्मश्री शितल महाजन उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतीय महिला विषयक चिंतन या विषयावर अखिल भारतीय महिला समन्वय सहसंयोजिका भाग्यश्री साठे यांचे व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या सत्रात गटचर्चा होणार असून भारताच्या विकासात महिलांचे योगदान या विषयावर मोटिवेशनल स्पीकर श्वेता शालिनी यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने संमेलनाचा समारोप होणार आहे.वडगाव शेरी हडपसर आणि येरवडा भागातील महिलांसाठी हे संमेलन महालक्ष्मी लॉन येथे होणार आहे.
गणेश कला क्रीडा मंच येथे सिंहगड पार्वती आणि कात्रज परिसरातील महिलांचे संमेलन रविवारी ७ जानेवारीला होणार आहे. उद्घाटनास आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू श्रीमती तेजस्विनी सावंत, लेखिका, समीक्षक डॉ. श्रीमती वीणा देव सहभागी होणार आहेत. डिक्की संस्थेच्या संचालक, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सीमा कांबळे यांचे भारतीय महिला विषयक चिंतन या विषयावर व्याख्यान होणार आहे. महिलांची सद्यस्थिती, समस्या व निराकरण या विषयावर यावेळी चर्चा सत्रातून मंथन होईल. समारोप सत्रात अभिनेत्री, राष्ट्रीय महिला आयोग सदस्य श्रीमती खुशबू सुंदर, तसेच अभिनेत्री शर्वरी जमेनीस पाहुणे म्हणून उपस्थित असतील. यावेळी महिला समन्वय राष्ट्रीय सहसंयोजिका श्रीमती भाग्यश्री साठ्ये भारताच्या विकासात महिलांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करतील.
आपल्या माध्यमातील महिला माध्यमकर्मी यांना या संमेलनास सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण.
अधिक माहितीसाठी संपर्क –
कर्मयोगिनी महिला संमेलन संपर्क – सौ सुजाता कृष्णकांत सातव 9850892689
संवर्धिनी महिला संमेलन संपर्क – सारिका वाघ – 9850064316