संसदेतील घुसखोरी प्रकरणात अटकेत असलेल्या सहापैकी पाच आरोपींची पॉलीग्राफ आणि नार्को चाचणी केली जाणार आहे. यामध्ये घुसखोरीचा मास्टरमाइंड ललित झा, महेश कुमावत आणि अमोल शिंदे यांची पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे. आरोपी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी पॉलीग्राफ, नार्को एनालिसिस आणि ब्रेन मॅपिंगसाठी सहमती दर्शवली आहे, तर आरोपी नीलम आझादने पॉलीग्राफ चाचणीसाठी सहमती दर्शवली नाही. उपरोक्त सहा आरोपींची पोलीस कोठडी शुक्रवारी (५ जानेवारी) संपणार होती. त्यामुळे पोलिसांनी सहाही आरोपींना पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. यावेळी न्यायालयात पॉलीग्राफ चाचणीबाबत सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने सहाही आरोपींच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची वाढ केली आहे.
दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यासोबतच आरोपींची पॉलीग्राफ, नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंगसाठीही अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने आरोपीला कायदेशीर मदत करणाऱ्या वकिलांशी बोलण्यास सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी नष्ट केलेल्या मोबाईलचे सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत, तर काही डेटाही जप्त करण्यात आला आहे. तसेच अनेक तथ्ये आहेत जी आरोपींनी लपविण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत या सर्वांची मानसशास्त्रीय चाचणी आवश्यक आहे. आम्हाला मनोरंजन आणि सागरची नार्को चाचणी करावी लागेल.
दरम्यान आरोपींच्या वकिलांनी कोठडी वाढवण्याच्या मागणीला विरोध केला. नीलम आझादच्या वकिलाने सांगितले की, सोशल मीडिया डेटा तपासण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. काही पासवर्ड लपविल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
संसद हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण होत असतानाच १३ डिसेंबर रोजी नव्या संसद भवनातील लोकसभा प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांनी सभागृहात उडी घेतली आणि स्मोक कँडल फोडल्या होत्या. तसेच त्यानंतर काही वेळात संसद परिसरातही अन्य काहींनी स्मोक कॅंडल फोडल्या. त्या प्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते.