दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. संपूर्ण सामन्यात आफ्रिकन संघाचे वर्चस्व दिसून आले आहे. तर भारताच्या या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताचे माजी दिग्गज खेळाडू संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल भाष्य केलं आहे.
भारताच्या पराभवानंतर ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना संजय मांजरेकर म्हणाले की, ‘मला वाटतं भारतीय संघाने पहिल्या डावात 245 धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना काही प्रमाणात कमी लेखले, पण हो कर्णधार म्हणून रोहित शर्मासाठी हा सर्वोत्तम दिवस किंवा कसोटी सामन्यांपैकी एक सामना नव्हता. कारण दुपारच्या जेवणानंतर शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजी करालया पाठवले ही मोठी चूक झाली.
मांजरेकर पुढे म्हणाले, ‘भारतीय संघाच्या गोलंदाजीचा आराखडा आणि गोलंदाजांमध्ये झालेला बदल आश्चर्यकारक होता. हे संपूर्ण कसोटी सामन्यात दिसून आले. तुम्ही मार्को जॅनसेनला पाहता, त्याच्या फलंदाजीदरम्यान त्याने जो सिक्स मारला तो केएल राहुलला पकडता आला नाही. त्यानंतर त्याला काही चेंडू टाकण्यात आले. त्यानंतर एक बाउन्सर आणि फुल लेंथ डिलिव्हरी, हे अनपेक्षित होते. यावेळी कर्णधार रोहित शर्माने इथे येऊन वेळ निघून जात आहे, शिस्त जपा, असे सांगायला हवे होते.
कर्णधारपदाव्यतिरिक्त हा सामना रोहित शर्मासाठी फलंदाजीच्या बाबतीतही वाईट ठरला. भारताच्या पहिल्या डावात रोहित शर्मा अवघ्या 5 धावा करून कागिसो रबाडाचा बळी ठरला. रोहितचा हा खराब फॉर्म दुसऱ्या डावातही कायम राहिला आणि त्याला खातेही उघडता आले नाही.