भारतीय नौदलाने आज धडाकेबाज मोहीम यशस्वी केली असून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. भारतीय नौदलाचे मार्कोस कमांडोंज सोमालिया जवळ अपहरण झालेल्या एमव्ही लीला नॉरफॉक जहाजातील सर्व 15 भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात यशस्वी ठरले आहेत. भारतीय नौदलाच्या कमांडोंनी समुद्री चाच्यांना पळवून लावले आहे.
सोमालियाच्या किनारपट्टीवरील एमव्ही लिला नॉरफोक या अपहृत जहाजातून 15 भारतीय नागरिकांसह सर्व 21 क्रू सदस्यांना आज भारतीय नौदलाने सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
भारतीय नौदलाचे मरीन कमांडो आज लायबेरियन ध्वज असलेले व्यावसायिक जहाज एमव्ही लीला नॉरफोकवर उतरले आणि अपहरणकर्त्यांचा खात्मा केला. नौदलाच्या आयएनएस चेन्नईमधून कमांडो नॉरफोक जहाजाजवळ आले होते.
संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार अरबी समुद्रात समुद्री चाचेंविरोधात कारवाई करण्याचे निर्देश भारतीय युद्धनौकांना दिले आहेत. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी अरबी समुद्रात भारतीय नौदलाने चार युद्ध नौका तैनात केल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून मालवाहू जहाजांवरील हल्ले वाढले आहेत. 23 डिसेंबर रोजी अरबी समुद्राच्या पोरबंदर किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या एका वाणिज्य जहाजावर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता.