शुक्रवारी पुण्याच्या कोथरूड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये शरद मोहोळ हा जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर पुणे पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासांमध्येच आरोपीना बेड्या ठोकल्या. आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून शरद मोहोळची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
शरद मोहोळ याचा काल लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसादिवशीच त्याची हत्या करण्यात आली आहे. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास शरद मोहोळ जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडला, तेव्हा तीन अज्ञातांनी दुचाकीवरून येऊन त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये तो जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु होते मात्र, उपचारादरम्यानच त्याच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाले. पुणे पोलीस व गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपासाची चक्र फिरवली. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींचा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाठलाग सुरु केला आणि शिरवळ जवळ या आरोपींना बेड्या ठोकल्या.कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर खंडणी, अपहरण, हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल होते.