भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्रोची सौर मोहीम आदित्य L1 आज अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे. इस्रोने याबाबत माहिती दिली आहे.आज ‘आदित्य’ हा उपग्रह एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येणार आहे. यासाठी इस्रो आज काही मॅन्यूव्हर पार पाडणार आहे. साधारपणे सायंकाळी चार वाजता ही प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
.आता आदित्य L-1 आज दुपारी 4 वाजता त्याच्या एल-1 या गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे. आदित्य L-1 यानाला अवकाशात L-1 या पॉईंटवर ठेवण्यात येणार आहे. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील L1 ह्या पॉइंटवर हे यान पाठवण्यात येणार आहे. पृथ्वीपासून L1 चे अंतर सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख किलोमीटर आहे. म्हणजेच आदित्य-एल1 पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किलोमीटर दूर पाठवले जाणार आहे. यासाठी आज सायंकाळी इस्रोतील वैज्ञानिक आणि ISTRAC येथील मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्समधील इंजिनियर प्रयत्न करतील.
L-1 या पॉईंटवर आदित्य एल-1 हे अंतराळयान दोन वर्षे सूर्याचा सखोल अभ्यास करेल, ज्यामुळे भविष्यात अंतराळाची अनेक रहस्य उलडण्यास मदत होणार आहे. 2 सप्टेंबर 2023 मध्ये इस्रोचे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 हे अंतराळात झेपावले होते. आता सुमारे एक महिन्यानंतर हे यान अपेक्षित स्थळी पोहोचणार आहे. इस्रोच्या या मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलं आहे. आदित्य एल-1 अंतराळयानाचे सात पेलोड्स सौर घटनेचा अभ्यास करतील.
आदित्य-एल1 मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “या मिशनद्वारे फक्त सूर्याचाच अभ्यास करता येईल असे नाही , तर 400 कोटीच्या या प्रोजेक्टमधून सूर्यावर येणाऱ्या वादळांची माहिती मिळेल. त्यामुळे भारताचे 50 हजार कोटींचे अनेक उपग्रह सुरक्षित ठेवता येतील. एकप्रकारे ही देशाची मदतच आहे. हा प्रोजेक्ट देशासाठी खूप महत्त्वाचा आहे”सूर्याचा अभ्यास आणि प्रत्येक छोट्यात छोट्या घडामोडीची माहिती देण्यासाठी ‘आदित्य एल1’ हे या मिशनचे उद्दिष्ट असून सौर वातावरण, सूर्याची ऊर्जा, सूर्याचा पृष्ठभाग, सूर्यावर येणारे भूकंप ह्याबद्दलच्या घडामोडींचा अभ्यास करता येणार आहे.