राज्यातील अनेक भागांत पुन्हा अवकाळ पाऊस झाला आहे. हवामान विभागाने राज्यांत शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला. शेत आणि शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला.
बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. मोताळा तालुक्यांमध्ये पाऊस झाल्यावर आता खामगाव तालुक्यात सुद्धा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. . या पावसामुळे कांदा, तूर, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अहमदनगरमध्येही शुक्रवारी पावसाचा फटका बसला असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यासह हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही होणार आहे.
राज्यात पुढील 48 तासात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.