सश्रद्ध हिंदू समाजाच्या रामचरणी असलेल्या अति तीव्र श्रद्धांचे प्रतिक म्हणजे अयोध्देतील रामललांचे अति भव्य, सुंदर, दणकट मंदिर आहे. हिंदू समाजाच्या श्रद्धेशी खेळ केल्यामुळे हिंदू समाजपुरुषाने तीव्र भावनेचा जो प्रचंड स्फोट घडवून आणला त्या सश्रद्ध भावनांचे प्रतिक म्हणजे अयोद्धेतील रामललांचे मंदिर आहे. या दृष्टिकोनातून पाहिल्यावर अयोद्धास्थित राममंदिर हिंदूंना, भारतीयांना भविष्यासाठी काय संकेत देत आहे, अपेक्षा व्यक्त करत आहे? हे जाणून घेणे आवश्यक ठरते.
श्रद्धा, भावना या नवनिर्मितीच्या मुख्य प्रेरणा असतात. देशाच्या श्रद्धास्थानांचा, प्रतिकांचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा देत असतो. श्रद्धास्थाने अपमानित करण्यासाठी काशी विश्वेश्वराचे मंदिर तोडले जाते, तो अपमानाचा सल समाजाला व शिवाजी महाराजांना संघर्षासाठी प्रेरित करीत असतो तर धर्म ही उच्चतम भावना छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल सहन करीत आलेल्या मृत्यूवर मात करून मृत्युंजय होण्यासाठी प्रेरणा देत राहते. या तत्वासाठी खंडीभर उदाहरणांनी इतिहास भरून वहात आहे. असीम त्यागाच्या उदाहरणांनी शीखांचा इतिहास तर ओतप्रोत भरलेला आहे.
तपशीलांची गरजच नाही एवढे महत्व श्रद्धा, भावनांना आहे हे आपण अनुभवलेले आहे. पण या श्रद्धांशी खेळ करण्याची सुरसुरी सरकार, विचारवंत यांना भारतात येत असते. परके, इस्लामिक आक्रमक तर धर्माज्ञा मानून हिंदूंच्या श्रद्धांशी धुळवड खेळत होते. पण स्वतंत्र भारतात पुरोगामित्वाच्या नावाने, घटनेच्या आडून, विज्ञानवादाच्या बुरख्याआड श्रद्धेचा अपमान करण्याची व त्यासाठी तत्वज्ञान उभे करण्याची एक विकृत रचना जगभर व भारतात रचली गेली आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धा लपवून अथवा हीनभाव स्वीकारून सामान्य सश्रद्ध माणसाला स्वतंत्र भारतात जगावे लागत होते.
सामाजिक जीवनाला कीड लावणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या श्रद्धांना कायद्याचे कोंदण व समाजात सार्वजनिक नियमांच्या आड न येणाऱ्या हिंदू श्रद्धांची मात्र हेळसांड असे आपल्या देशाचे स्वरूप होऊन बसले होते. यावेळी श्रद्धेच्या बळावर उभे राहिलेले राम मंदिर आम्हाला काय संकेत देते?, कसे वागायला सांगते?
कोणत्याही समाजाच्या श्रद्धा, भावना या त्या त्या समाजाला, देशाला कार्यप्रवण करत असतात. सकारात्मक उर्जा निर्माण करत असतात. त्याच गोष्टींवर उघड अथवा छुपे हल्ले करून तो समाज हतबुद्ध बनवणे, क्रियाशून्य बनविणे हे शत्रूला, वैचारिक विकृतांना व तात्कालिक लाभांसाठी सरकारला आवश्यक वाटत असते. अशा वेळी समाजानेच स्वतःची प्रेरणास्रोत असलेल्या श्रद्धा, परंपरा, संकेत यांचे रक्षण करावे लागते. श्रद्धा, भावना या शास्त्र विरोधी नसतात तर नवनवीन संशोधनासाठी प्रेरणास्रोत बनत असतात. इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ हे म्हणूनच अत्याधुनिक शास्त्राच्या यशासाठी तिरूपतीच्या श्री बालाजीला साकडे घालतात. तर बहुतांश आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कौशल्याबरोबर नशीबाची साथ असावी म्हणून अनेक श्रद्धांचा आधार लागतो.
म्हणूनच श्रद्धेच्या असीमित सकारात्मक शक्तीने बनलेले अयोध्येतील राम मंदिर आपणास भविष्यासाठी हेच सुचवत आहे. श्रद्धांची अवहेलना करून, या श्रद्धा ज्या समाजाची प्रेरणा असतात, त्या समाजाला हतबुद्ध होऊ देऊ नका.
शबरीमलाच्या मंदिरात कोणी यायचे आणि कोणी नाही याचा निर्णय न्यायालयाने नाही तर सश्रद्ध समाजानेच घ्यायचा असतो कारण तो तरुण शबरीमला दगड नसून ब्रम्हचारी युवक आहे अशी श्रद्धा असणाऱ्या समाजाला तो तसा भावतो म्हणून. म्हणूनच भारतातील प्रत्येक दगडसुद्धा प्रेरणा निर्माण करू शकतो. त्यामुळे यापुढे भारतात अणुसारखी शक्ती असणाऱ्या या श्रद्धा सर्वांनीच जपल्या पाहिजेत. मग ती गाय असो, गीता असो वा गंगा. पिढ्यानपिढ्या खपून बनवलेली मंदिरे असोत वा तक्षशीला, नालंदा विद्यापीठ असोत; संस्कृती संभाळणाऱ्या यात्रा, जत्रा, वारी असो, श्रद्धेचा उपमर्द होऊ देणार नाही, करू देणार नाही हे समाजाने सर्व व्यवस्थांना समजावून सांगितले पाहिजे आणि जर आगळीक झालीच तर परत राम मंदिरासारखे आंदोलन होईल अशी खात्री दिली पाहिजे.
#राममंदिर #राष्ट्रमंदिर
– सुनील देशपांडे, ९४२०४९५१३२
सौजन्य – विश्व संवाद केंद्र