राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘शेकरू’ या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले.
या निमित्ताने नाशिक येथे महोत्सव स्थळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. माणिक कोकाटे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. वर्षा शासकीय निवासस्थानी आमदार मनिषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.
तर केंद्रीय कुटूंब कल्याण व आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बोरसे, केंद्रीय सचिव मीता राजीव लोचन दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा शेकरू हा राज्य प्राणी शुभंकर म्हणून निवडल्याबदद्ल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा शेकरू हा दिमाखदार राज्याचं वैशिष्ट्ये सर्वांसमोर पहिल्यांदाच अशा स्वरुपात येत आहे. शेकरू हा शांतता, मैत्री, गतीशीलता आणि पर्यावरण प्रेमाचं प्रतिक आहे. त्यातूनही युवकांना प्रेरणा मिळेल.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाच्या बोधचिन्हांचे आणि बोधवाक्य, घोषवाक्यांचेही अनावरण करण्यात आले. ‘युवा के लिए – युवा द्वारा हे बोधवाक्य आहे. तर महाराष्ट्रासाठी ‘सशक्त युवा- समर्थ भारत’ हे घोषवाक्य आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला जी-२० नंतर पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी चालून आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हा राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे. आहे. त्यासाठी मोठ्या वेगाने तयारी सुरु आहे. यातून महाराष्ट्राची संस्कृती व कला परंपरा ही देशभर पोहोचवता येणार आहे. सोळा वर्षांनंतर महाराष्ट्राला या युवा महोत्सवाच्या आय़ोजनाचं यजमानपद मिळालं आहे. यात जास्तीत युवक सहभागी होतील. हा महोत्सव उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत दिमाखदार होईल, असे नियोजन करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
नाशिक शहराला प्रभू श्रीरामचंद्र यांचे पदस्पर्श झाले आहेत. तर तिकडे अयोध्येत श्रीराम मंदिर साकारले जात आहेत, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. म्हणाले, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. त्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. मंदिर पुर्णत्वास जात असतानाच आपल्याला श्रीरामांचे पदस्पर्श झालेल्या नाशिक मध्ये आपण युवा महोत्सवांच्या आयोजनाची चांगली संधी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. अशा या नगरीत देशभरातील युवकांचे उत्स्फूर्त स्वागत केले जाईल. त्यासाठी सर्व यंत्रणांनी पुरेपूर काळजी घ्यावी, काटेकोर नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
क्रीडा मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, देशातील युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी देशात या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही संधी महाराष्ट्राला मिळाली, याचा आनंद आहे. स्वामी विवेकानंद हे समाज सुधारक व ज्यांच्या विचारातून लोकांमध्ये क्रांती घडविण्याचे काम केले आहे. त्यांचे विचार आजही सर्व युवकांना प्रेरणा व प्रोत्साहन देत आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून कला, साहित्य, तंत्रज्ञान, विज्ञान, संस्कृती यांचा अनोखा अनुभव नाशिककरांना घेता येणार असल्याने, जास्तीत जास्त युवक व नागरिकांनी या युवा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. क्रीडा आय़ुक्त श्री. दिवसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नाशिक येथे युवा वर्ग, खेळाडू, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथील तपोवन मैदानावर १२ ते १६ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशामधील ८ हजार युवक सहभागी होणार आहेत