भारताची पहिलीच सौरमोहीम, आदित्य एल-1 ही यशस्वीपणे पार पाडून इस्रोने आज पुन्हा एक नवा इतिहास रचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर आज संध्याकाळी प्रस्थापित करण्यात आला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून हा उपग्रह याठिकाणी पोहोचला आहे. पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किमी पर्यंतचा प्रवास भारताच्या आदित्य एल 1 ने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
आदित्य एल – १ ही एक भारताची सूर्याजवळची ही एक वेधशाळाच असणार आहे.आदित्य एल1 मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत.यातले चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करणार आहेत.
इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी भारताच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. “अगदी जटिल असं स्पेस मिशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन.. मी आणि संपूर्ण देश आज या वैज्ञानिकांचं कौतुक करत आहे.” अशा आशयाची पोस्ट पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवरून शेयर केली आहे.