ढाका : आज (7 जानेवारी) बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीवर प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना सलग चौथ्यांदा विजयी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष बीएनपीने निवडणुकीला विरोध केला असून 48 तासांच्या देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, त्यांनी देशभरातील 300 मतदारसंघांमध्ये मतदानाची तयारी जवळपास पूर्ण केली आहे आणि सुरक्षा व्यवस्थाही सुनिश्चित केली आहे. तर रविवारी 42,000 हून अधिक मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानात एकूण 11.96 कोटी नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावतील, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
बांगलादेशातील सुमारे 170 दशलक्ष लोक रविवारी 12 व्या राष्ट्रीय निवडणुकीत 299 खासदारांना निवडण्यासाठी मतदान करतील. तर या सार्वत्रिक निवडणुकीत 27 राजकीय पक्षांचे 1,500 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यांच्याशिवाय 436 अपक्ष उमेदवारही आहेत. भारतातील तीन निरीक्षकांसह 100 हून अधिक परदेशी निरीक्षक 12 व्या सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष ठेवतील. कडेकोट बंदोबस्तात ही निवडणूक होत आहे.
मतदान सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजता संपेल. 8 जानेवारीला सकाळी निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
निवडणूक लढवणाऱ्या 27 पक्षांमध्ये विरोधी राष्ट्रीय पक्षाचाही समावेश आहे. उर्वरित सत्ताधारी अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सदस्य आहेत. बीएनपीने निवडणुकीवर बहिष्कार टाकत 6 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 8 जानेवारी रोजी 48 तासांच्या देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे. सध्याच्या सरकारच्या काळात कोणतीही निवडणूक निष्पक्ष आणि विश्वासार्ह होणार नाही, असा पक्षाचा दावा आहे.
माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने पंतप्रधान हसिना यांच्या सत्ताधारी अवामी लीगला सलग चौथ्यांदा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे. खलिदा या भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरल्यानंतर त्या नजरकैदेत आहेत. शेख हसीना यांनी या आठवड्यात राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केलेल्या भाषणात, लोकशाही समर्थक आणि कायद्याचे पालन करणार्या पक्षांना देशाच्या घटनात्मक प्रक्रियेला ‘अडथळा’ आणणार्या अशा कल्पनांना प्रोत्साहन देऊ नये असे आवाहन केले होते. दरम्यान, बीएनपीने शनिवारपासून 48 तासांच्या देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे.