मंगळूरू : ‘कांतारा’ हा चित्रपट चांगलाच सुपरहीट ठरला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला होता की त्याचे संपूर्ण जगभरात कौतुक झाले होते. या चित्रपटामुळे अभिनेता ऋषभ शेट्टी देखील प्रसिद्धीझोतात आला. ऋषभ शेट्टीने कांतारा चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तर या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक करण्यात आले होते. तर आता लवकरच कांताराचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटाचे शूट कुंडपुकच्या अणेगुड्डे येथे पार पडले. यावोळा ऋषभ शेट्टीने मंगळुरू येथील वज्रदेही मठाला भेट दिली. तसेच ऋषभ शेट्टी मंगळुरू येथील देव कोला उत्सवातही सहभागी झाला होता. ऋषभला वज्रदेही मठाचे स्वामीजी वज्रदेही श्री यांनी आमंत्रित केले होते. सध्या ऋषभचे या उत्सवातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कांतारा चित्रपटाच्या पुढच्या भागाची घोषणा स्वत: ऋषभ शेट्टीने केली आहे. कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 असे या प्रीक्वलचे नाव आहे. तसेच या चित्रपटातील ऋषभ शेट्टीचा फर्स्ट लूक आणि टीझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये ऋषभ शेट्टी रक्ताने माखलेला दिसत आहे. तर त्याच्या हातात त्रिशुळ दिसत आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये निर्मात्यांनी आगामी चित्रपटाच्या टीझरचे अनावरण केले होते. या टीझरचा समारोप सात वेगवेगळ्या रागांच्या संगीताने झाला आहे ज्यामध्ये प्रत्येकी सात भाषांचे प्रतिनिधित्व केले जाणार आहे.
दरम्यान, जेव्हापासून याबाबतची माहिती चाहत्यांना मिळाली आहे तेव्हापासून ते चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.