नवी दिल्ली : सध्या दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके पसरत आहे. तर या धुक्यामुळ्ये दिल्लीत किमान 22 रेल्वे गाड्या उशिराने धावणार आहेत. तसेच रविवारी सकाळी दिल्लीत दृश्यमानता कमी झाली असल्याचे, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, अजमेर-कटरा पूजा एक्स्प्रेस, जम्मूतावी अजमेर एक्स्प्रेस आणि फिरोजपूर-सिवनी या रेल्वे जवळपास 6.30 तास उशिराने धावणार आहेत. तर खजुराव-कुरुक्षेत्र एक्सप्रेस आणि सिवनी-फिरोजपूर सुमारे 4 तास उशिराने धावणार आहेत. तसेच पुरी-नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्स्प्रेस, कानपूर-नवी दिल्ली श्रमशक्ती, दिब्रुगढ-नवी दिल्ली राजधानी, बंगलोर-निजामुद्दीन, राजेंद्रनगर-नवी दिल्ली राजधानी आणि सहरसा-नवी दिल्ली वैशाली एक्स्प्रेससह सुमारे 11 ट्रेन सुमारे 1-1.30 तास उशिराने धावणार आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर-आनंद विहार एक्सप्रेस, चेन्नई-नवी दिल्ली जीटी आणि जम्मूतावी-नवी दिल्ली राजधानीसह तीन गाड्या 2 तास उशिराने धावणार आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या मते, पुढील दिवसात दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये तीव्र थंडी कायम राहण्याची आणि त्यानंतर त्यामध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान 9-12 अंशांच्या श्रेणीत आहे; आणि उत्तर राजस्थान, दिल्ली, वायव्य मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये 13-16 अंशांच्या श्रेणीत आहे. या भागांमध्ये थंडी सामान्यपेक्षा 4-9 अंशांनी कमी आहे.
राजस्थान, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश, वायव्य मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये किमान तापमान 6-15 अंशांच्या श्रेणीत आहे. आज, सीकर (पूर्व राजस्थान) येथे सर्वात कमी किमान तापमान 2 अंश नोंदवले गेले. तसेच IMD नुसार, वायव्य आणि मध्य भारतात 8-10 जानेवारी दरम्यान गडगडाटी वादळ/गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.