ढाका : बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानादरम्यान अनेक ठिकाणाहून हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. चटगाव-10 मतदारसंघातील पहारी कॉलेजमध्ये दोन पक्षांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान गोळीबार देखील करण्यात आला. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही ठिकाणी मतदान केंद्रे जाळल्याचीही माहिती समोर आली आहे. या भागातील नाओचे उमेदवार मोहम्मद मोहिउद्दीन आहेत. तर माजी महापौर मोहम्मद मंजूर आलम हे चटगाव महापालिकेचे अपक्ष उमेदवार झाले आहेत.
गोळीबाराच्या या घटनेला चटगाव मेट्रोपॉलिटन पोलिस डीसी नॉर्थ यांनी दुजोरा दिला आहे. तसेच, पोलिसांनी चटगावच्या महिला अध्यक्षाला अनियमिततेच्या आरोपाखाली अटक केली आहे.
मतदान सुरू होण्यापूर्वी 10 जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराची नोंद झाली होती. हिंसाचारादरम्यान, 14 मतदान केंद्रे आणि शाळांना काहीजणांनी आग लावली. शेख सुंदर मास्तरपारा प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्राला शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. याशिवाय मैमनसिंग येथे एका केंद्राला आग लावण्यात आली. यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली.
बांगलादेशात 37 ठिकाणी अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे वृत्त आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, देशभरातील 37 मतदान केंद्रांवरून गैरप्रकार आणि अनियमिततेच्या घटना समोर आल्या आहेत. सोबतच बनावट मतदानाच्या आरोपाखाली 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने बांगलादेशात मतदानादरम्यान हिंसक चकमकी होण्याची भीती आधीच होती. तसेच शेख हसीना पंतप्रधान असताना त्या कधीही निवडणुका जिंकू शकत नाहीत, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.