मुंबई | वादग्रस्त अभिनेते किरण माने हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरण माने राजकारण प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर आज (7 जानेवारी) किरण मानेंनी राजकारणात प्रवेश केला आहे. माने यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर किरण मानेंची जोरदार चर्चा सुरू आहे.
किरण मानेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “मी एक सर्वसामान्य माणून आणि सामान्य कलाकार आहे. तसेच शिवसेना सर्वसामान्यांची आहे. आज समाजातील वातावरण खूप गढूळ झालेले आहे आणि अशावेळी उद्धव ठाकरे हे एकमेव नेता आहेत जे लढत आहेत. या लढाईत त्यांच्या पाठिशी उभे राहणे महत्त्वाचे आहे त्यामुळे मी ही राजकीय भूमिका घेतली आहे, असे किरण माने म्हणाले.
तर किरण मानेंनी पक्षप्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, माने तुम्हाला जे पाहावत नाही ते खरे आहे, तुमच्याकडे शब्दाची ताकद आहे. त्यामुळे आपण दोघेही लढू. तुम्हाला सेनेत पश्चाताप होणार नाही. तर तुम्ही सेनेत आलात त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल.
दरम्यान, किरण माने हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहे. त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुलगी झाली हो, माझ्या नवऱ्याची बायको, सिंधुताई माझी आई या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच मुलगी झाली हो या मालिकेमुळे ते चांगलेच वादात सापडले होते आणि चर्चेतही आले होते. तसेच ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे ते चांगलेच प्रसिद्धीझोतात आले.