मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते सत्येन चौधरी यांची हत्या करण्यात आली आहे. दोन अज्ञातांनी गोळ्या झाडून सत्येन चौधरी यांची हत्या केली आहे. ही घटना रविवारी दुपारी बहरामपूरच्या चालतिया येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी टीएमसी नेते सत्येन चौधरी यांना जवळून गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर सत्येन चौधरी यांना तातडीने मुर्शिदाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येन चौधरी हे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या खूप जवळचे होते. पण नंतर ते सत्ताधारी टीएमसीमध्ये सामील झाले होते. अलीकडे सत्येन हे सत्ताधारी पक्षापासून लांब राहत होते. दरम्यान, रविवारी दुपारी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.