पुणे | 5 जानेवारी रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या साथीदारांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोळ्या झाडल्यानंतर शरदला सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मला न्याय मिळावा अशी मागणी केली. तसेच खुन्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.
स्वाती मोहोळ या पुणे शहर भाजप महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. एप्रिल 2013 मध्ये स्वाती यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, शुक्रवारी शरद मोहोळने त्याच्या पत्नीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तर लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच शरदची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, शरद मोहोळच्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.