नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी रविवारी सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यामुळे आता त्या पाचव्यांदा देशाच्या पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या पक्ष, अवामी लीगने हिंसाचाराच्या तुरळक घटना आणि मुख्य विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि त्याच्या मित्रपक्षांनी बहिष्कार टाकलेल्या निवडणुकीत दोन तृतीयांश जागा जिंकल्या.
शेख हसीना यांच्या पक्षाने 300 सदस्यांच्या संसदेत 200 जागा जिंकल्या आहेत. रविवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘आतापर्यंत उपलब्ध निकालांच्या आधारे आम्ही अवामी लीगला विजेता म्हणू शकतो, पण उर्वरित मतदारसंघातील मतमोजणी संपल्यानंतर अंतिम घोषणा केली जाईल.’
हसीना यांनी गोपालगंज-3 लोकसभा जागेवर पुन्हा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना 2,49,965 मते मिळाली, तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी बांगलादेश सुप्रीम पार्टीचे एम निजाम उद्दीन लष्कर यांना केवळ 469 मते मिळाली. 2009 पासून बांगलादेशातील सत्तेची धुरा हसीना यांच्या हातात आहे. त्यापूर्वी 1991 ते 1996 या काळात हसीना पंतप्रधान होत्या.