नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधानही यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.
15 नोव्हेंबर 2023 रोजी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाल्यापासून, पंतप्रधानांनी देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी नियमितपणे संवाद साधला आहे. आत्तापर्यंत त्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चार वेळा संवाद झाला आहे. तसेच, पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात वाराणसीच्या भेटीदरम्यान सलग दोन दिवस विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला होता.
या योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचतील याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजनांची परिपूर्णता मिळवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात हाती घेण्यात येत आहे. 5 जानेवारी 2024 रोजी, विकसित भारत संकल्प यात्रेने एक मोठा टप्पा ओलांडला कारण यात्रेतील सहभागींची संख्या 10 कोटी ओलांडली, असे निवेदनात म्हटले आहे.