येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच या खास सोहळ्याला अनेक नेतेमंडळींसह कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. अशातच आता साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
येत्या 12 जानेवारीला तेजा सज्जा यांचा ‘हनुमान’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. तर आता या चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते चिरंजीवी यांनी मोठी घोषणा केली आहे.
सध्या हनुमान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री इव्हेंट हैदराबादमध्ये पार पडला. या प्री इव्हेंटमध्ये सुपरस्टार चिरंजीवी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली की, हनुमान चित्रपटाच्या प्रत्येक तिकीटामागील पाच रूपये हे अयोध्येतील राम मंदिरासाठी दान म्हणून देणार आहे.
यावेळी चिरंजीवी यांनी सांगितले की, हनुमान चित्रपटाच्या निमित्ताने निर्मात्यांना एक घोषणा करायची आहे. या चित्रपटाची जेवढी तिकीटे विकली जातील त्या प्रत्येक तिकीटामागे पाच रूपये राम मंदिरासाठी दान म्हणून दिले जाणार आहेत. ही घोषणा मी टीमच्या वतीने करतो. तसेच या गोष्टीसाठी मी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. चिरंजीवींनी ही घोषणा करताच त्यांच्यावर सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, हनुमान चित्रपटात तेजा सज्जा हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार आणि राज दीपक शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. तर सिनेमॅटिक युनिव्हर्सची हनुमान चित्रपटाची ही पहिली निर्मिती आहे.