पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यामुळे मालदीवच्या पर्यटनाला फटका बस्तान दिसत आहे. कारण अनेक पर्यटकांनी मालदीवचे बुकिंग रद्द केले आहे व त्यांची पावले लक्षद्वीपकडे वळताना दिसत आहेत. यामुळे मालदीवचा तिळपापड झालेला दिसून आला. मालदीवच्या काही मंत्र्यांनी सोशल मीडियावरून मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यावर टीका केली होती. त्यानंतर भारताच्या दबावानंतर मालदिव सरकारने या मंत्र्यांची हकालपट्टी केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावरून भारतातील मालदीवचे राजदूत इब्राहिम शाहीब आज दिल्लीतील विदेश मंत्रालयातून बाहेर येताना दिसले. मालदीवचे उपमंत्री, इतर कॅबिनेट सदस्य आणि सरकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यावर टीका केल्यानंतर गेल्या आठवड्यात मोठा वाद निर्माण झाला होता. २ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिली होती. तसेच तिथे त्यांनी वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद लुटला. यासंदर्भातील अनेक छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ”जे आपल्यामध्ये साहस अंगिकारू इच्छितात, त्यांनी लक्षद्वीपला भेट देणे आवश्यक हे”, अशी पोस्ट देखील त्यांनी शेअर केली होती.
यावरून, मालदीवचे युवा सक्षमीकरण उपमंत्री शिउना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा उल्लेख उपहासात्मक आणि अनादर करणार अशा पद्धतीने केला. काही कालावधीनंतर ही पोस्ट हटविण्यात आली आहे. मालदीव सरकारने आपल्या मंत्र्यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. परदेशी नेत्यांबाबत अशी वक्तव्ये अस्वीकार्य आहेत आणि ही वक्तव्ये सरकारची अधिकृत भूमिका दर्शवत नाहीत, असे मालदिवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मुसा झमीर म्हणाले. एक्स वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये झमीर म्हणाले, ”परदेशी नेते आणि आमचे शेजारी यांच्या विरोधातील विधाने अस्वीकार्य आहे आणि #मालदीव सरकारची अधिकृत भूमिका ही वक्तव्ये दर्शवत नाहीत. आम्ही सर्वांशी सकारात्मक, रचनात्मक संवाद साधण्यासाठी कटिबद्ध आहोत.”