शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला असून १० जानेवारी ला हा शिवसेना आमदारांचे भवितव्य ठरणार आहेत. या निकालाकडे राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेले आहे.
आमदार अपात्रतेचा निर्णय विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. नार्वेकरांकडे सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी दिली असून सध्या निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे. निकालाचे ठळक मुद्दे विधानभवनामध्ये वाचले जाणार असून निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत.
त्यानंतर सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पुढच्या दोनच दिवसांत हे स्पष्ट होणार आहे की, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात आता चर्चेत आलेल्या दिसत आहेत.