अयोध्येत जन्मस्थानावर प्रभू रामांचे मंदिर उभे राहिले आहे. ते भव्य-दिव्य झाले आहे, सुंदर आणि दणकट देखील झाले आहे. हिंदू समाजाने स्वत्व जागवून एकत्र कृतीतून हे घडवून आणले आहे. समाज स्वबळावर काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती! पण मंदिराचा विषय मार्गी लागला असला तरी त्यासाठी झालेल्या आंदोलनातून निर्माण झालेली सामाजिक चेतना, स्वाभिमान, स्वत्वाची ओळख या उर्जेचा नेमका उपयोग कसा होणार? यासंदर्भात समाजाकडून काही अपेक्षा आहेत का?आणि भारतीय समाज म्हणून काही अपेक्षा आहेत का आणि त्या काय आहेत? अयोध्येतील राममंदिर त्यासाठी कोणते संकेत देते? हे आपण जाणून घेत आहोत.
समाजाच्या सामूहिक ऊर्जेचा सकारात्मक उपयोग काय घडवू शकतो हे साऱ्या जगाने बघितले, अनुभवले. त्यामुळे भारताकडून जगाच्या पण काही अपेक्षा आहेत का? जागतिक नेतृत्व म्हणजे नेमके काय? आर्थिक शोषण की आर्थिक सहयोग?, संघर्ष की समन्वय?, सामाजिक सहजीवन की संस्कृती निर्दलन? असे सारे प्रश्न एकत्र केले की, भारताच्या वैश्विक जबाबदारीची जाणीव आपल्याला होत रहाते.
अयोध्येतील राम मंदिर आपल्यामध्ये ह्या कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव निर्माण करीत रहाते. प्रभू रामचंद्रांनी भारताचा उत्तर-दक्षिण प्रवास पायी केला, थोडा-थोडका नाही तर १४ वर्षे केला. या संपूर्ण प्रवासातील प्रभू रामचंद्रांचे आचरण हा एक आदर्श असल्याने जगाप्रती आपले वर्तन कसे असावे, जगाला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत याची जाणीव हे राम मंदिर आपल्याला करून देते.
प्रभू रामचंद्रांनी आपल्या वनवासातील प्रवासात ‘दुरितांचे तिमिर जावो’ असा भाव ठेवला होता. मग ते अहिल्येचे शापमुक्त होणे असेल वा शबरी भिल्लीणीची उष्टी बोरे खाणे असेल. संकटात सापडलेल्या सुग्रीवासाठी वालीचा वध असेल, ऋषि-मुनींच्या आश्रमांना होणारा राक्षसांचा उपद्रव मोडून काढण्यासाठी करावा लागलेला शस्त्रसंहार असेल; प्रभू श्रीरामांचे आचरण ‘जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती’ असेच राहिले. त्याचप्रमाणे वडिलधाऱ्यांच्या शद्बाचा आदर करणे असेल की थोरा-मोठ्यांबाबतचा भक्तिभाव असेल प्रभू रामचंद्रांनी आवश्यक ती सर्व कर्तव्ये पार पाडली.
भारताकडून, भारतीय समाजाकडून हीच अपेक्षा जगाची असल्याची जाणीव हे मंदिर करून देत आहे. आपल्या देशात राजकीय सत्तेला ज्या-ज्या वेळी सांस्कृतिक जबाबदारीचे भान आले त्या-त्यावेळी भारतीय समाजाने विश्वाप्रती असलेली आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पूर्ण करून दाखवल्या आहेत.
‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ हे भारताने जागतिक स्तरावरील दिलेले सांस्कृतिक योगदान आहे. यातून भारताला काही मिळवायचे आहे असे नाही तर जगाच्या कल्याणासाठी हितकारक ठरेल असा ठेवा जगाला देण्याचा उदात्त विचार आहे, ही दानाची संस्कृती आहे. कोट्यावधी भारतीय जेव्हा प्रत्यक्ष योगाभ्यास करतात तेव्हाच जगाला योगाचे महात्म्य आणि योग दिनाचे महत्व पटते. यात वैश्विक संदेश काय आहे? योगातील स्तवन, प्रार्थना या एखाद्या समाजाच्या हितासाठी नाही तर संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी आहे, हे विश्वभर पटवून देणे ही वैश्विक जबाबदारी आहे.
कोरोना महामारीच्या काळात भारताने निरपेक्ष भावनेने जगाला प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिली. भारताचे हे वर्तन संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरावे असे आहे. उपचारासाठीची लस संपूर्ण मानव जातीच्या रक्षणासाठी शोधली होती आणि तितक्याच सेवाभावाने ती जगाला उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळेच जगाच्या पाठीवरील अनेक देश “भारताने केलेल्या सहकार्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत” असे कृतज्ञतापूर्वक सांगतात. प्रभू रामाचे अनुयायी म्हणून अशाप्रकारे वैश्विक भूमिका पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. भविष्यात देखील तितक्याच निरलसपणे आपण अशी जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी अपेक्षा हे मंदिर व्यक्त करत आहे.
जगभरात पसरलेला हिंदू समाज आज त्या-त्या देशात निरपेक्ष भावनेने जी सेवा करीत आहे त्यामागील भावना ही हिंदू संस्कृतीचीच शिकवण आहे.
भारत आणि भारतीयांकडून असलेला वैश्विक मार्गदर्शनाचा व कृतीचा संकेत हे राम मंदिर आपल्याला देत आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडू यात शंका नाही, कारण आपल्या पाठीशी आपल्या परंपरेचे आणि अजरामर संस्कृतीचे पाठबळ आहे.
#राममंदिर #राष्ट्रमंदिर
लेखक : सुनील देशपांडे, मोबाईल नं. : ९४२०४९५१३२
सौजन्य – विश्व संवाद केंद्र