बेंगळुरू : भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या वादाचा परिणाम पर्यटकांवरही पाहायला मिळणार आहे. कारण भारतीय प्रवासी कंपन्या आता मालदीवसाठी बुकिंग रद्द करत आहेत. सोबतच या कंपन्या पर्यटकांना लक्षद्वीपला जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. यासाठी ट्रॅव्हल कंपन्यांनी लक्षद्वीपला जाण्यासाठी काही खास पॅकेजही सुरू केले आहेत.
EaseMyTrip चे सह-संस्थापक प्रशांत पिट्टी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, ‘आमची कंपनी पूर्णपणे भारतीय आणि मेड इन इंडिया आहे. मालदीवसोबतच्या वादानंतर आम्ही आमच्या देश आणि सरकारसोबत उभे आहोत. त्यामुळे आम्ही भारतीयांना परदेशात न जाता भारताला भेट देण्याचे आवाहन करत आहोत.
पिट्टी म्हणाले, ‘मालदीवला भेट देणाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोक भारतीय आहेत. आमच्या पोर्टलने गेल्या वर्षी एकूण 8 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. यातील मोठा भाग मालदीवला भेट देणाऱ्यांचाही होता. पण, आत्ताच्या या वादानंतर आमच्या पोर्टलद्वारे मालदीवसाठी जे काही बुकिंग केले आहे, ते सर्व रद्द केले जात आहे.
ते पुढे म्हणाले, ‘आता आम्ही भविष्यात देखील मालदीवसाठी बुकिंग करणार नाही. आम्ही सर्व एअरलाईन्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांना विनंती करतो की त्यांनी मालदीवसाठी त्यांचे बुकिंग रद्द करावे आणि तेथे पुढील प्रवास बुक करू नये. सर्व ट्रॅव्हल कंपन्यांनी भारताच्या या मोहिमेत भाग घ्यावा आणि भेट देण्यासाठी भारतीय स्थळांना प्रोत्साहन द्यावे.
तसेच पिट्टी यांनी लक्षद्वीपसाठी काही खास पॅकेजही सुरू केले असून लोकांना तेथे भेट देण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, ‘आमच्या पोर्टलवर लक्षद्वीपसाठी 5 नवीन पॅकेजेस सुरू करण्यात येत आहेत. अयोध्या आणि लक्षद्वीपसारख्या पर्यटन स्थळांना आंतरराष्ट्रीय स्थळ बनवण्याची आमची तयारी आहे.
दरम्यान, बॉलीवूड स्टार्सही लक्षद्वीप या भारतीय शहराचे नाव घेऊन पर्यटनाला चालना देण्याविषयी बोलत आहेत. यामध्ये बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी सोमवारी लोकांना भारतीय बेटांचे सौंदर्य शोधण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने X वर शेअर केलेल्या एका पोस्टवर बिग बींनी प्रतिक्रिया दिली आहे. “विरू पाजी.. हे खूप समर्पक आहे आणि आपल्या भूमीच्या योग्य भावनेत आहे.. मी लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे आणि ती आश्चर्यकारकपणे सुंदर ठिकाणे आहेत.. आश्चर्यकारक पाण्याचे किनारे आणि पाण्याखालील अनुभव आहे. तसेच आम्ही भारतीय आहोत, आम्ही आत्मनिर्भर आहोत, आमच्या आत्मनिर्भरतेला काहीही दोष देऊ नका. जय हिंद” अशी पोस्ट बिग बींनी X वर पोस्ट केली आहे.
तर रविवारी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने अनेक छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले की, “उडुपीचे सुंदर किनारे असोत, पाँडीतील पॅराडाईज बीच, अंदमानमधील नील आणि हॅवलॉक आणि आपल्या देशभरातील इतर अनेक सुंदर समुद्रकिनारे असोत, अनेक अनपेक्षित ठिकाणे आहेत. भारतामध्ये काही पायाभूत सुविधांच्या सहाय्याने खूप क्षमता आहे. तर कृपया तुम्हीही तुमच्या आवडत्या अनपेक्षित सुंदर ठिकाणांची नावे सांगा.”
सोबतच रणवीर सिंग, श्रद्धा कपूर, वरुण धवन, सलमान खान, अक्षय कुमार, कंगना रणौत, जॉन अब्राहम आणि इतर बॉलीवूड सेलिब्रिटी देखील एक्सप्लोरइंडियन आयलँड्स हॅशटॅग अंतर्गत ‘लक्षद्वीपला भेट द्या’ मोहिमेत सामील झाले आहेत.