“कर्मयोगिनी ” महिला संमेलनात २००० महिलांचा सहभाग
महिला संमेलने ही स्त्री शक्तीचा जागर करतील, महिलांना संघटित करतील, त्या भारतीय तत्वज्ञानाचे चिंतन घराघरात करतील व भविष्यात महिलांचे सक्रिय योगदानच भारताला विश्वगुरु म्हणून जगात नावलौकिक मिळवून देईल असे वक्तव्य भाग्यश्री साठ्ये महिला समन्वय राष्ट्रीय सह संयोजिका यांनी महालक्ष्मी लॉन, पुणे नगर रोड येथे बोलताना केले.
दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात जनसेवा न्यास यांच्या वतीने येरवडा, वडगावशेरी व हडपसर भागातील महिलांचे संमेलन पार पडले. या संमेलनास २००० महिला उपस्थित होत्या. संमेलनाचे उद्घाटन स्काय ड्रायवर पद्मश्री शितल महाजन, पोलीस अधिकारी मनिषा पाटील, सुनिता करपे, यांच्या उपस्थित भारतमातेचे पुजन करून झाले. संमेलन संयोजिका सुजाता सातव यांनी प्रास्ताविकातून संमेलनाची संकल्पना सांगितली. आर्या शेंदूर्णीकर याचे गटाने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सत्राची सुरवात झाली.
‘भारतीय महिला विषयक चिंतन’ या विषयाच्या अनुषंगाने भाग्यश्री साठ्ये यांनी आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या “स्त्री सृजनतेचे प्रतिक आहे. म्हणूनच पूर्वी आईच्या किंवा पत्नीच्या नावाने पुरुषांची ओळख होत. स्त्रीचे आदराचे व सन्मानाचे स्थान आपल्या भारतीय चिंतनात आहे”. पद्मश्री शितल महाजन यांनी स्काय डॉयविंग याविषयात करियर करताना कौटुंबिक, सामाजिक दृष्टीकोन व प्रत्यक्ष या क्षेत्रात उतरू इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांना अनेक महत्वाची सूत्रे सांगितली. कौटुंबिक संवाद व चांगला मित्रपरिवार हा मानसिक भावनिक आवाहने पेलण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सउदाहरणे स्पष्ट केले.
गट चर्चेच्या माध्यमातून ‘सध्यस्थितील महिल्यांच्या समस्या व समाधान’ याविषयी स्थानिक प्रश्न व त्यावर आधारित गटचर्चा करून उपस्थित महिलांनी त्यावर समाधान व उपाय योजनांच्या अनुषंगाने उहापोह केला.
समारोप सत्रात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी उपस्थितांना सिनेक्षेत्रातील कष्ट, अस्थिरता व पात्रांची अचुक निवड याविषयी अनेक उदाहरणे देत स्व-अनुभव कथन केले. आपल्याकडे शिवाजी महाराजांचा इतिहास नीट सांगितला जात नाही याची खंत व्यक्त केली.
मोटिव्हेशनल स्पीकर, श्वेता शालिनी यांनी ‘भारताच्या विकासात महिलांचे योगदान’ या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित महिलांना देशातील महिलांच्या स्थिती बाबतची अनेक अंगांने आकडेवारी देत माहिती दिली. “महिलांना सक्षमीकरण नकोय, महिलामध्ये ती शक्ती आहेच गरज आहे त्यांना आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याची” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रांत सह-संयोजिका अपर्णा नागेश पाटील उपस्थित होत्या.
Tags: NULL