सध्या भारत आणि मालदीव यांच्यात तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता भारतीय पर्यटकांसाठी लक्षद्वीप हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध केले जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यटन स्थळ म्हणून लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केले होते. त्यांनी हे फोटो शेअर केल्यानंतर लक्षद्वीप हे चांगलेच चर्चेत आले आहे. तर दुसरीकडे भारत-मालदीव वादादरम्यान टाटा समूहाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
टाटा समूह आता लक्षद्वीप येथील सुहेली आणि कदमता या दोन सुंदर बेटांवर ताज ब्रँडेड रिसॉर्ट बांधणार आहे. पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी टाटा समूहाची आदरातिथ्य शाखा, इंडियन हॉटेल्स कंपनीने (IHCL) ही मोठी घोषणा केली आहे. तर या दोन बेटांवर रिसॉर्ट बांधण्यासाठी इंडियन हॉटेल्स कंपनीने करार केले आहेत.
सुहेली आणि कदमत ही बेटे त्यांच्या निळसर पाण्यासाठी आणि पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. तर या बेटावर बांधण्यात येणारे हे रिसॉर्ट्स 2026 मध्ये सुरू होणार आहेत. तसेच हे दोन्ही रिसॉर्ट्स स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाला धक्का न लावता बांधले जाणार आहेत.
या नव्याने बांधण्यात येणाऱ्या ताज सुहेलीमध्ये 60 बीच व्हिला आणि 50 वॉटर व्हिलासह 110 खोल्या असणार आहेत. तर ताज कदमतमध्ये 75 बीच व्हिला आणि 35 वॉटर व्हिलासह 110 खोल्या असणार आहेत.