केप टाउन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन कसोटीच्या पहिल्याच दिवशी चुरशीचा सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी दमदार अशी कामगिरी केली. तर दुसरीकडे या सामन्यादरम्यान दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज केशव महाराज आणि भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
सामन्यादरम्यान जेव्हा दक्षिण आफ्रिकेची सहावी विकेट पडली त्यानंतर केशव महाराज फलंदाजीला आला. पण जेव्हाही केशव महाराज फलंदाजीला येतो तेव्हा मैदानावर ‘राम सिया राम’ हे गाणे वाजल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. आताही असेच काहीसे घडले. केशव महाराजच्या एन्ट्रीवर हे गाणे वाजताच विराट कोहली हात जोडून धनुष्यबाणाची पोज देतो. जे चाहत्यांना खूपच आवडले आहे आणि चाहत्यांनी त्याचे कौतुकही केले आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर केशव महाराजने त्याच्या एन्ट्रीदरम्यान वाजवल्या जाणाऱ्या गाण्याबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “ते गाणे माझे प्रवेशगीत आहे. मी भगवान हनुमान आणि प्रभू राम यांचा भक्त आहे म्हणून मला वाटते की माझ्यासाठी ते एक योग्य गाणे आहे.”
दरम्यान, कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली कारण दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी जिंकली तर भारताने दमदार विजय मिळवून पुनरागमन केले. दक्षिण आफ्रिकेचा संघ केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात फक्त 55 धावा करत ऑलआऊट झाला होता. दुसऱ्या डावात या संघाने 3 विकेट्ससह 62 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे, टीम इंडिया पहिल्या डावात 153 धावा करून ऑलआऊट झाली होती.