पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली होती. तसेच तिथे अनेक विकासकामांचे उदघाटन केले. त्यानंतर लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद देखील पंतप्रधान मोदींनी घेतला होता. भारत लक्षद्वीप बेट आणि आजूबाजूचा परिसराला पर्यटनासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार करत असताना, भारत आता मिनीकॉय बेटांवर एक नवीन एअरफिल्ड विकसित करण्याची योजना आखत आहे. हे एअरफिल्ड व्यवसायिक विमानांसह लष्करी विमाने चालवण्यास सक्षम असेल.
सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले, ”एक संयुक्त एअरफिल्ड तयार करणे ही योजना असून, ज्यात लढाऊ विमाने, लष्करी विमाने आणि व्यावसायिक विमाने धावू शकतात.” मिनीकॉय बेटांमध्ये हे नवीन एअरफिल्ड विकसित करण्यासाठी सरकारकडे यापूर्वीही प्रस्ताव देण्यात आले होते. मात्र संयुक्त वापराच्या संरक्षण एअरफिल्डची ही योजना अलीकडच्या काळात पुनरुज्जीवित झाली असून, त्यावर सक्रियपणे काम केले जात आहे , असे त्यांनी सांगितले.
लष्करी दृष्टिकोनातून हे नवीन एअरफिल्ड भारतासाठी एक महत्वाचे ठिकाण बनेल कारण, याचा उपयोग अरबी समुद्र आणि हिंदी महासागर क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले पहिले दल होते, ज्याने मिनीकॉय बेटांवर एअरफिल्ड विकसित करण्याचा सल्ला दिला होता. सध्याच्या प्रस्तावानुसार भारतीय वायू सेना मिनीकॉय मधून ऑपरेशन्स करण्यासाठी आघाडीवर असेल. तसेच मिनीकॉय येथे एअरफिल्ड झाल्यास संरक्षण दलांना अरबी समुद्रात टेहळणी क्षेत्राचा विस्तार करता येईल. मिनिकॉय येथील विमानतळामुळे या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल.गेल्या आठ्वड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी भेट दिली होती. तेव्हापासून हा प्रदेश नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.