मालदीवच्या काही मंत्र्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर #बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरु झाला. मालदीव सरकारने मोदींवर चुकीची टिपण्णी करणाऱ्या मंत्र्यांना निलंबित केले असून त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींवर झालेल्या या चुकीच्या टिपण्णीबद्दल शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मालदीवमधील एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या प्रतिक्रियेमुळे जो वाद निर्माण झाला आहे त्यावर शरद पवार यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार म्हणाले, इतर देशातील कोणत्याही पदावर असलेल्या कोणीही पंतप्रधानांवर अपमानास्पद बोलत असेल तर ते मान्य नाही. तर याच मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून सर्वकाही व्यक्तिगतपणे घेत आहेत.
शरद पवार मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले, ”नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. इतर कोणत्याही पदावर असलेल्या कोणीही आपल्या पंतप्रधानांवर अशी टिपण्णी केल्यास ते आम्ही स्वीकारणार नाही.” तर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ” नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सर्व काही वैयक्तिकरित्या घेत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. आपण वेळेनुसार काम केले पाहिजे. आपण आपले शेजारी बदलू शकत नाही. ”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यामुळे मालदीवच्या पर्यटनाला फटका बसताना दिसत आहे. कारण अनेक पर्यटकांनी मालदीवचे बुकिंग रद्द केले आहे व त्यांची पावले लक्षद्वीपकडे वळताना दिसत आहेत. यामुळे मालदीवचा तिळपापड झालेला दिसून आला. मालदीवच्या काही मंत्र्यांनी सोशल मीडियावरून मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यावर टीका केली होती. त्यानंतर भारताच्या दबावानंतर मालदिव सरकारने या मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे.